Untitled 1

अद्भुत फलदायी श्रीगोरक्षनाथ उपासना

वेब साईटच्या आणि देवाच्या डाव्या हाती / नाथ संकेतींचा दंशु च्या वाचकांकडून नेहमी एखादी नाथपंथी साधना सुचविण्याविषयी मागणी होत असते. खरंतर नाथपंथी साधना आपापल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उत्तम असतात. परंतु सर्वांना असा गुरु किंवा मार्गदर्शक मिळणे अवघड आहे हे लक्षात घेऊन एक साधी-सोपी पण अत्यंक अद्भूत फलदायक अशी साधना विषद करत आहे. मागच्या वर्षी या साधनेचे संक्षिप्त विवरण मी केले होते. आज त्याचेच थोडे विस्ताराने वर्णन करत आहे.

लक्षात घ्या ही साधना नाथापंथी विचारधारेवर आणि गुरुपरंपरेवर पूर्ण विश्वास असेल तरच करावी. काही वेळा साधक आगोदरच दुसऱ्या एखाद्या सत्पुरुषाची उपासना करत असतो. त्या सत्पुरुषावरील श्रद्धा आणि नाथपंथी परंपरेवरील श्रद्धा यांची गल्लत करू नये. प्रत्येक सत्पुरुष आपापल्या जागी श्रेष्ठच असतो. तेंव्हा आपली श्रद्धा आणि मनाचा कल प्रथम पहावा. केवळ करून पहायची म्हणून ही उपासना करू नये.

उपासना कोणाची?

ही उपासना आहे नाथसिद्ध श्रीगोरक्षनाथांची. नाथपंथाची विचारधारा आणि शिकवण विस्ताराने विषद येथे करत नाही. देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या दोन पुस्तकांमध्ये मी ती विषद केलेली आहे. नाथपंथाचे संस्थापक म्हणून जरी मच्छिंद्रनाथांचे नाव घेतले जात असले तरी नाथपंथाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे श्रेय बरेचसे गोरक्षनाथांना द्यावे लागेल. गोरक्षनाथ उच्च कोटीचे सिद्ध होते. मच्छिंद्रनाथां बरोबरच अवधूत दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांचे कृपाशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव होते. त्यामुळे गोरक्षनाथांमध्ये शैव, दत्त आणि नाथ या तीनही संप्रदायांचे गुणविशेष दिसून येतात.

गोरक्षनाथांचा काळ साधारण १०-११ शतकाच्या आसपासचा मानला जातो. सिद्धांचे एक वैशिष्ठ म्हणजे ते जड देहाचा त्याग केल्यावरसुद्धा सूक्ष्म रूपाने जगात विचारण करू शकतात. गोरक्षनाथ आजही गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांच्या सेवेत आहेत अशी सांप्रदायिक मान्यता आहे. अनेक नाथपंथी साधकांना दृष्टांत रूपाने त्यांनी उपकृत केलेले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या गुरुपरंपरा सुद्धा मच्छिंद्र-गोरक्ष यांपासूनच आलेली आहे.

सर्वसामान्य साधक उपासना काम्य गोष्टींची करतो. उपासनेच्या माध्यमातून आपले सांसारिक प्रश्न आणि चिंता मिटतील या भावनेने तो साधनारत होत असतो. मी जी साधना विषद करणार आहे ती वेगळी आहे. त्या साधनेचा प्रमुख लाभ आहे गोरक्षनाथांची कृपाप्राप्ती, गुरुतत्वाचा बोध आणि गुरुकृपेची प्राप्ती. अर्थात ती मिळाली की खरंतर सर्वच प्राप्त झाल्यासारखे आहे.

ही साधना दैनंदिन जीवनाचा भाग बनवायलाही हरकत नाही. काही वेळा काय होतं की साधक नित्यकर्म म्हणून अन्य काही साधना आगोदरपासून करत असतो. किंवा दैनंदिन जीवनात अधिक काळ साधना करणे त्याला शक्य होत नाही. अशांनी निदान सलग पंचेचाळीस दिवस ही साधना करावी. दरवर्षी श्रावण किंवा अन्य शुभ समयी ती परत परत करण्याचा नेमही साधक बनवू शकतो. तात्पर्य हे की आपापली सोय आणि जीवनशैली यांना अनुसुरून साधनारत व्हावे.

साहित्य

 ही उपासना करण्यासाठी तुम्हाला खालील साहित्य आवश्यक आहे. एक लक्षात ठेवा - कोणत्याही गोष्टीचे अवडंबर नको. जेवढे सहज शक्य आहे तेवढे जरूर करा.

१. भगवान शिव आणि अवधून दत्तात्रेय यांचा एक-एक फोटो. जर देवघरात असेल तर तो वापरावा. जर नसेल आणि विकत आणणे शक्य नसेल तर नाही ठेवला तरी चालेल.

२. एक मोठ्या आकाराचा तुपाचा दिवा. हा दिवा मोठ्या आकाराचा हवा कारण पुढे मी जो मंत्र सांगणार आहे त्याचा जप पूर्ण होईपर्यंत तो तेवत राहिला पाहिजे.

३. गाईचं तूप आणि दिव्यात वापरायला कापसाची वात.

४. रुद्राक्षांपासून बनविलेली जपमाळ. नसेल तर जी उपलब्ध असेल ती वापरावी.

५. लोकरीचे आसन. कांबळे किंवा तत्सम उनी आसन वापरू शकता. लाकूड, प्लास्टिक, सिंथेटिक पदार्थ यांपासून बनलेले आसन टाळावे.

साधनेत वापरायचे तीन मंत्र

दत्तात्रेय मंत्र अथवा गुरु मंत्र :

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा / अन्य दत्तात्रेय मंत्र / गुरु मंत्र

नवनाथ शाबर मंत्र :

ॐ नमो आदेश गुरु की
ॐकारे आदिनाथ, उदयनाथ पार्वती, सत्यनाथ ब्रह्मा, सन्तोषनाथ विष्णू,
अचल अचम्भेनाथ, गजबेली गजकन्थडिनाथ, ज्ञानपारखी चौरंगीनाथ,
मायारुपी मच्छेन्द्रनाथ, जतिगुरु है गोरखनाथ,
घट-घट पिण्डे व्यापी, नाथ सदा रहें सहाई,
नवनाथ चौरासी सिद्धों की दुहाई
ॐ नमो आदेश गुरु की

गोरक्षनाथ मंत्र :

ॐ शिव गोरक्ष

एक गोष्ट लक्षात ठेवा की वरील मंत्रांचे काही पाठभेद सुद्धा प्रचलित आहेत. येथे सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारे अनुभूत पाठ दिलेले आहेत. यांतील पहिला आणि दुसरा मंत्र या लेखात वर्णन केलेल्या साधनेच्या दृष्टीने गौण आहे तर तिसरा जो आहे तो प्रधान आहे.

प्रत्यक्ष साधना करण्यापूर्वी हे मंत्र तोंडपाठ करावेत. काही वेळा साधक कागदावर लिहून घेऊन तो कागद पुढ्यात ठेवतात आणि साधनेला बसतात. तसे करू नये. मंत्र सोपे आहेत. कोणालाही सहज पाठ होतील असे आहेत. तेंव्हा तेवढा "गृहपाठ" करूनच साधनेला बसावे.

नवनाथ शाबर मंत्र हा नवनाथांची कृपा मिळवून देणारा असा मंत्र आहे. या मंत्रात उल्लेखिलेली नवनाथ परंपरा सामान्यतः महाराष्ट्रात ज्ञात असलेल्या नवनाथ परंपरेपेक्षा वेगळी आहे. या मंत्राने शंकर, पार्वती, ब्रह्मा, विष्णू, शेषनाग, गणपती, चौरंगीनाथ, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ह्या नवनाथांची कृपा साधकाला प्राप्त होते.

भगवान दत्तात्रेय नाथपंथाचे सद्गुरू असल्याने त्यांची कृपा साधकाला आवश्यक ठरते. जर तुम्ही स्वतःच्या गुरुकडून "गुरुमंत्र" घेतला असेल तर तो वापरावा अन्यथा दत्तात्रेयांचा कोणताही नाममंत्र वापरावा.

तिसरा जो मंत्र आहे तो गोरक्षनाथांचा सुप्रसिद्ध मंत्र आहे. जणू नाममंत्रच म्हणाना.  गोरक्षनाथांना भगवान शंकराचा "शंभू जती" अवतार मानलं जातं. या मंत्रात शिव आणि गोरक्ष ही दोनही नामे एकत्र आलेली आहेत. गोरक्षनाथांना शिवस्वरूप मानून त्यांच्याकडे आशीर्वचन मागणे हा या मंत्राचा प्रमुख उद्देश आहे.

साधना सुरु करायचा दिवस

खरंतर ही पूर्णतः सात्विक आणि भक्तिप्रधान साधना असल्याने ती कधीही सुरु करण्यास काहीच हरकत नाही. तरीही दिवसांचा विचार करता - गुरुवार, प्रदोष, पौर्णिमा, दुर्गाष्टमी किंवा दत्त जयंती / महाशिवरात्री सारखा एखादा शुभ मुहूर्त पाहून साधनेला सुरवात करावी. साधना शक्यतो सकाळी ४ ते ६ या दरम्यान करावी. शक्य नसेल तर रात्री केली तरी चालेल. एकदा वेळ निवडली की ती बदलू नये.

साधनेचा विधी

१. प्रथम एका चौरंगावर शंकराची आणि दत्तात्रेयांची फोटो / तसबिर नीट मांडावी.

२. त्यापुढे एका स्टीलच्या छोट्या ताटलीत तुपाचा दिवा ठेवावा. दिव्यात वात घालून, तूपही घालून ठेवावे.

३. चौरंगापुढे आसन टाकावे. आतां तो दिवा प्रज्वलित करावा. ही प्रज्वलित केलेली ज्योत गोरक्षस्वरूप मानावी.

४. शंकराच्या आणि दत्तात्रेयांच्या फोटोला आणि प्रज्वलित केलेल्या त्या दिव्याला भक्तिभावाने फुले वाहावीत. शक्य असेल तर धूप किंवा नैसर्गिक पदार्थांनी बनलेली अगरबत्ती लावावी.

५. दोन्ही फोटो आणि तुपाच्या दिव्याची ज्योत यांना भक्तिभावाने नमस्कार करावा.

६. आता त्या ज्योतीकडे बघत बघत खालीलप्रमाणे जप करायचे आहेत. लक्षात ठेवा ज्योतीकडे बघणे म्हणजे त्राटक करणे नव्हे. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करायला हरकत नाही. ताण येऊ देऊ नये नाहीतर लक्ष विचलित होते.

७.  प्रथम दत्तात्रेयांचा मंत्र किंवा गुरुमंत्र एक माळ अर्थात १०८ एवढा जपावा. जप पूर्ण झाल्यावर तो भगवान दत्तात्रेयांच्या चरणी अथवा गुरुचरणी अर्पण करावा. ज्योतीला नमस्कार करावा. माळ शेजारी ठेवावी.

८. त्यानंतर नवनाथ शाबर मंत्र फक्त नऊ वेळा म्हणावा. तो म्हणत असतांना जपमाळ वापरण्याची गरज नाही. मनातल्या मनात किंवा बोटांवर मोजावा. जप नऊ वेळा म्हणून झाल्यावर मनातल्या मनात नवनाथांना अर्पण करावा आणि त्या ज्योतीला नमस्कार करावा.  

९. आंता गोरक्षनाथ मंत्राच्या विषम संख्येने माळा जपाव्यात जसे १, ३, ५, ११, २१ वगैरे. किती माळा कराव्यात ते तुमच्याकडे उपलब्ध वेळ किती आहे त्यावर ठरवावे. एकदा ठरवल्या की माळांची संख्या बदलु नये. पहिल्या दिवशी पाच माळा मग दुसऱ्या दिवशी एक माळ असे करू नये. उगीच उत्साहाच्या भरात बऱ्याच माळा जप करण्याच्या फंदात पडू नये.

१०. गोरक्षनाथ मंत्राचा जप पूर्ण झाला की तो भक्तिभावाने गोरक्ष चरणी अर्पण करावा. ज्योतीला नमस्कार करावा. माहित असेल तर "आदेश" करावा. गोरक्षनाथांकडे आशीर्वाद मागावा. मार्गदर्शनाची विनंती करावी. पहिल्या दिवसापासून आपल्या सांसारिक अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचू नये. आसनावरच पाच मिनिटे डोळे मिटून आपल्या नैसर्गिकपणे होणाऱ्या श्वासांवर मन ठेऊन अर्थात अजपा करत बसून राहावे. साधना संपल्यावर साधनेच्या सर्व वस्तू स्वतः आवराव्यात.

अशा प्रकारे ही साधना प्रतिदिन करावी. जशी जशी तुमची प्रगती होत जाईल तशी तशी तुम्हाला अद्भुत अनुभूती येऊ लागतील. गुरुतत्वाचे जणू एक कवच सदैव तुमच्या बरोबर आहे असे जाणवू लागेल. अध्यात्म साधनेत येणारी विघ्नं आणि विक्षेप कमी होऊ लागतील. हा अनुभव स्वतःच घ्यावा हे उत्तम. फार काही येथे सांगत नाही.

असो.

आज गुरुवार आहे, कोजागरी पौर्णिमाही आहे. आजच्या मुहूर्तावर ही साधना सुरवात करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी सर्व वाचकांना खुप खुप शुभेच्छा !!


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 05 October 2017