Untitled 1

पितृपक्ष आणि अजपा योग

पितृपक्ष सुरु होत आहे. अनेक घरांमधून श्राद्ध-तर्पणादी क्रिया करण्यात येतील. काही जण अशा क्रिया केवळ प्रथा म्हणून करतात तर काही जण पितृदोष निवारणार्थ करतात. असं म्हणतात की ज्यांच्या पूर्वजांचे श्राद्धसंस्कार नीट झालेले नसतात किंवा त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्यांच्या ज्योतिषीय जन्मकुंडलीत त्याची काही चिन्ह प्रकट होत असतात. त्यालाच ज्योतिषीय भाषेत पितृदोष म्हणतात. प्रामुख्याने सूर्य, चंद्र, राहू, केतू, आणि शनि यांचा त्याच्याशी संबंध सांगितला जातो. हा दोष दूर करण्यासाठी मग अनेकानेक उपाय सांगितले जातात. अनेकदा पितृदोष आणि  तत्संबंधी माहिती वाचून लोकांच्या मनात भीतीही निर्माण होत असते. आजच्या शहरी धावपळीच्या जीवनात अशा प्रथा काहीशा अडचणीच्याच वाटतात. नवीन पिढीतील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या लोकांना तर अशी क्रियाकर्म म्हणजे भोळसटपणा किंवा थोतांड वाटण्याचा संभव आहे.

असो. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार अशा प्रथा पाळायच्या किंवा नाही ते ठरवत असतो. त्यांतील चूक काय नी बरोबर काय त्या चर्चेत जाण्याचे आपल्याला कारण नाही. तो आपला विषय नाही. आपल्याला येथे हे जाणून घ्यायचे आहे की अजपा योगसाधनेद्वारा आपण आपल्या पूर्वजांचे कल्याण साधू शकतो का? त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो का?

आता मुळात प्रश्न हा आहे की जे पूर्वज काळाच्या कराल मुखात गडप झालेले आहेत त्यांची आठवण काढण्याची किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरजच काय. हा मेलेले मढे उकरून काढण्याचाच प्रकार नाही का. पूर्णतः रुक्ष तार्किक विचार करायचा झाला तर असे करणे कदाचित चुकीचे ठरू शकेल. आधुनिक काळात माणसांतील कृतघ्नपणा वारेमाप वाढला असून कृतज्ञता आटत चालली आहे. ज्या पूर्वजांमुळे आज आपण अस्तित्वात आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा मानवी देह प्राप्त झाला आहे त्यांच्याप्रति आभार प्रकट करणं यात खरंतर चुकीचं असं काही नाही. योगशास्त्र पुनर्जन्म, जीवांचा जन्म-मृत्युच्या साखळीतून होणारा प्रवास आणि आत्म्याचे अमरत्व मानणारे शास्त्र आहे. आता ही कृतज्ञता श्राद्ध-तर्पणादी कर्मकांडाच्या माध्यमातून करायची की योगसाधनेच्या माध्यमांतून करायची की अन्य काही प्रकारे व्यक्त करायची हा ज्याच्यात्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे.

येथे एक लक्षात घ्या की जी साधना आपण जाणून घेणार आहोत ती काही "उपाय" किंवा "तोडगा" म्हणून करायची गोष्ट नाही. त्या गोष्टींत अडकलेल्यांना खुशाल असे तोडगे शोधत राहुदे. आपण येथे शुद्ध आणि निखळ मनाने केवळ आपापल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, त्यांना उत्तम गती मिळावी या उद्देशानी काही साधना क्रिया जाणून घेणार आहोत.

ज्यांना मी स्वतः अजपा योगाची दीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही साधना आहे हे कृपया लक्षात घ्यावे. बाकीच्यांनी आपापल्या गुरुकडून यथायोग्य मार्गदर्शन घ्यावे हे उत्तम. ही साधना संपूर्ण पितृपक्षात करायची आहे. पितृपक्षाच्या प्रत्येक दिवशी श्राद्ध असतं. त्यांतील काही दिवसांचे विशिष्ठ महत्व आहे. उदाहरणार्थ खालील दिवस पहा :

 • जर एकाद्या अविवाहित व्यक्तीचा मृत्य झाला असेल तर त्याचं श्राद्ध पंचमीला करतात.
 • मृतक स्त्रियांचे श्राद्ध नवमीला करण्याची प्रथा आहे.
 • दिवंगत साधू, संन्यासी यांचे श्राद्ध एकादशीला केलं जाते.
 • ज्यांचा अकाल मृत्यू (अपघात, दुर्घटना वगैरे अनैसर्गिक कारणं) झाला असेल त्यांचे श्राद्ध चतुर्दशीला करण्याची प्रथा आहे.
 • सर्वपितृ अमावास्येला मृत्यूचे कारण ज्ञात अथवा अज्ञात असलेल्या सर्वांचे श्राद्ध करण्याची प्रथा आहे.

कोणत्याही श्राद्धात पिंडदान, अन्नदान असे विधी महत्वाचे मानले जातात. मेलेले पूर्वज स्थूल स्वरूपात अर्पण केलेलं अन्न ग्रहण करू शकत नाहीत हे तर उघडच आहे. पण मग हे अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचते कसे? योगशास्त्रात पंचमहाभूते आणि त्यांच्या तन्मात्रा यांचा विस्ताराने उहापोह केलेला आहे. पंचमहाभूतांनी बनलेले अन्न जरी पुर्वाजांपर्यंत थेट पोहचत नसले तरी सूक्ष्म तन्मात्रांच्या स्वरूपात ते ग्रहण केले जाते.

असो. वरील गोष्टी केवळ अधिक माहिती म्हणून सांगितल्या. आपल्या साधनेशी त्यांचा थेट संबंध नाही. आता मुख्य साधनेकडे वळू.

 • पितृपक्षात रोज सूर्यास्तानंतर ही साधना करायची आहे. रोज वेळ बदलू नये.
 • साधनेला बसल्यावर शिकवल्याप्रमाणे प्रथम योगाशास्त्रीय विधीनुसार आपल्या गुरुमंडलाचे पूजन करावे.
 • शिकवल्याप्रमाणे दिप, धूप वगैरे व्यवस्थित लावायचे आहेत.
 • नंतर अजपा क्रिया १ चे ३, ५, किंवा ७ मिनिटांचे आवर्तन करायचे आहे.
 • त्यानंतर जो गुरुमंत्र मी दिलेला आहे त्याच्या ७ माळा स्थिर अंतःकरणाने जपायच्या आहेत. रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरणे.
 • जप झाल्यानंतर अजपा क्रिया ४ चे ३, ५, किंवा ७ मिनिटांचे आवर्तन करायचे आहे.
 • साधना संपल्यावर इष्ट आणि गुरुमंडळाला अशी प्रार्थना करायची आहे की केलेला जप तुमच्या पूर्वजांच्या कल्याणाकरिता समर्पित होवो.
 •  साधना संपवून मौन राहून आसन उचलायचे आहे.

या दिवसांत गरीब लोकांना अन्नदान अवश्य करावे किंवा ते शक्य नसल्यास अन्य मार्गांनी मदत करावी. कोणत्याही परिचित अथवा अपरिचित व्यक्तीवर चिडू, रागावू नये. पशु-पक्ष्यांना मारू नये किंवा इजा पोहोचवू नये. शक्य असल्यास शिवमंदिरात / दत्तमंदिरात / नाथ मठात अवश्य जावे.

बस्स. एवढंच करा. बघा कसं छान आणि प्रसन्न वाटेल ते. परत सांगतो की "उपाय", "तोडगा" अशा मानसिकतेने ही साधना अजिबात फलदायी ठरणार नाही. फक्त प्रार्थनेचा आणि कृतज्ञतेचा भाव मनी असू द्या. शुद्ध, निर्मळ मनाने साधनारत झालात तरच छान प्रसन्न अनुभव येतील.

पितृ देवतेची प्रसन्नता सर्वाना लाभो अशी विनम्र प्रार्थना त्या जगदीश्वर परम-शिवाच्या चरणांशी करून लेखणीला येथेच विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 September 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates