योगाभ्यासाला हानीकारक गोष्टी

योगाभ्यासाला हानीकारक गोष्टी

लेखक : बिपीन जोशी

अत्याहारः प्रयासश्व प्रजल्पो नियमग्रहः।
जनसंगश्च लौल्यं च षडभिर्योगो विनश्यति॥

अति आहार, श्रम, व्य्रर्थ बडबड, नियमांविषयी आग्रह, सामान्य जनांशी संपर्क आणि चंचलता हे योग नाश करणारे सहा घटक आहेत.

सामान्यतः साधकांची अशी एक समजूत असते की योगाभ्यास म्हणजे सकाळ-संध्याकाळ तास दोन तास काही शारीरिक वा मानसिक क्रिया करणे. ही समजूत साफ चुकीची आहे. योग ही एक जीवनशैली आहे. काही काळ केली जाणारी साधना हा तीचा केवळ एक छोटा भाग आहे. साधकांची नेहमी एक तक्रार असते की अनेक वर्षे साधना करून सुद्धा काहीच फायदा झाला नाही. या तक्रारीचे मुळ बर्‍याचदा त्यांच्या जीवनशैलीत दडलेले असते. येथे स्वात्माराम असे काही घटक सांगत आहे जे साधकाने आपल्या आयुष्यातून हद्दपार केले पाहिजेत. हे सहा घटक जर टाळले नाहीत तर साधनेत फळ मिळत नाही अथवा फार विलंबाने मिळते.

अत्याहार

योग साधकाने टाळायचा सर्वात मोठा घटक म्हणजे अत्याहार. योग्याने आहार हा प्रमाणात आणि योग्य तो घ्यायला हवा. प्रमाणात म्हणजे काय? आयुर्वेदाच्या मते पोटाचे चार भाग कल्पून त्यातील दोन भाग अन्नाने, एक भाग द्रवाने भरणे श्रेयस्कर आहे. उरलेला एक भाग वात निर्मितीसाठी मोकळा ठेवला पाहिजे. यालाच मिताहार असे म्हणतात. आजकाल चमचमीत पदार्थ खाण्याची चटक बहुतांशी घरांत असते. पोट तुदूंब भरल्याशिवाय गडी पानावरून उठतच नाहीत! मिताहार हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे काय खावे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असते. कफ, वात, पित्त प्रकृती, कामाचे स्वरूप, आर्थिक परिस्थिती, राहण्याचे भौगोलिक ठिकाण इत्यादी अनेक गोष्टींवर काय खावे ते ठरते. सर्वसाधारणपणे असे सांगता येईल की जड, मसालेदार, अति गोड, अति तिखट, तेलकट, उष्ण आणि तीक्ष्ण पदार्थ टाळले पाहिजेत. 

येथे साध असा प्रश्न पडेल की मुळात आहार कमी का घ्यावा? विशेषतः कुंडलिनी योग साधकांना हे अत्यावश्यक आहे. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी शरीराला उर्ज़ा लागते. जर साधकाने अत्याहार घेतला तर अन्न पचवण्यासाठी लागणारी उर्जा जास्त असेल अर्थात उर्जेचा अपव्यय होईल. दुसरे असे की अति आहारामुळे शरीरात त्रिदोषांचा (कफ - वात - पित्त) समतोल बिघडतो, आम निर्माण होतो आणि नाना रोग निर्माण होतात. रोग निर्माण झाले की प्राणशक्ती क्षीण होते, नाडीशुद्धी होत नाही परिणामी कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. जर कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाने खाण्यापिण्याचे ताळतंत्र सोडले तर जागृत शक्तीला कार्यान्वीत होण्यास बाधा निर्माण होते परिणामी शरीरावर तीव्र लक्षणे दिसून येतात. शिव संहितेसारखे काही योगग्रंथ तर असे सांगतात की साधकाने केवळ देह जगवण्यापुरतेच अन्नग्रहण करावे.

श्रम

वर आपण पाहिले की योग्याने आहार अल्प प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आहार कमी केल्यामुळे योग्याला शारीरिक श्रम करण्याची ताकद असत नाही. अति श्रमाने शरीर दमते परिणामी निद्रेची गरज वाढते, शरीराची शांत अवस्था मोडते, श्वासोछ्वास जोराने होवू लागतो. परिणामी ध्यान नीट लागत नाही. तेव्हा योग्याने अति श्रम करू नयेत. अर्थात दैनंदीन कार्य करण्यास प्रत्यवाय नाही. पण शारीरिक परिश्रमाची कामे जसे खेळ, मैथून, वजन उचलणे, धावणे, लांबचा प्रवास करणे इत्यादी व्यर्ज करावीत. हठयोगशास्त्रात एकांतवासाला महत्व देण्यात आले आहे याचे हे सुद्धा एक कारण आहे. एकांतवासात उगीच व्यर्थ हालचाली वा कामे करण्यात उर्जा वाया जात नाही.

व्यर्थ बडबड

रोजच्या जीवनात बहुतांश माणसे बडबड करण्यात बराच वेळ आणि शक्ती वाया घालवतात. माणसाला एकमेकांशी संवाद साधायला आवडतो, विचार, मते यांची देवाणघेवाण आवडते हे खरे आहे पण ज्याला योगी व्हायचे आहे त्याने कटाक्षाने वायफळ बडबडीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. केवळ आवश्यक तेवढेच बोलावे. विशेषतः प्रखरपणे साधना चालू असताना हे आवश्यक आहे. अति बोलल्याने शक्ती तर वाया जातेच पण मनही विखुरते. मनातील विचार वाढतात. वृत्ती बहिर्गामी बनतात. मधून मधून मौन व्रताचे आचरण योग्यासाठी फायद्याचे असते.

नियमांविषयी आग्रह

वरवर पाहता तुम्हाला असे वाटण्याचा संभव आहे की एकिकडे योग्याने शिस्तबद्ध जीवन जगावे असे सांगितले जाते आणि दुसरिकडे त्याने नियमांविषयी आग्रही राहू नये असे सांगितले आहे. हा विरोधाभास नाही का? येथे स्वात्मारामाला नियमांविषयीचा दुराग्रह असा अर्थ अभिप्रेत आहे. समजा रोज तुम्हाला गरम पाण्याने स्नान करून मग साधनेला बसण्याची सवय आहे. जर एक दिवस गरम पाणी मिळाले नाही म्हणून जर तुम्ही साधना टाळत असाल तर ते बरोबर नाही. या अर्थाने 'नियमांचा आग्रह' स्वात्मारामाला अपेक्षित आहे. हाच प्रकार कर्मकांडात्मक धार्मिक विधी, खानपानाच्या सवयी, झोप इत्यादींचा बाबतीत आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे योग्याने कोणत्याही बाबतीत अति टोकाची भुमिका घेता कामा नये. याचे कारण असे की साधनेच्या काळात योग्याची सर्व उर्जा कुंडलिनी शक्ती जागृत करण्याकडे लावलेली असते. योग्याचे मन एका वेगळ्याच पातळीवर असते. अशा वेळी कडक नियमांद्वारे शरिराला जाच देणे हे योग्य नाही.

सामान्य जनांशी संपर्क

हठयोग ग्रंथ वारंवार एकांतात साधना करा असे सांगतात. त्याचे मुख्य कारण असे की योग्याची मानसिक बैठक आणि सामान्य लोकांची मानसिक बैठक यात जमीन अस्मानाचा फरक असतो. येथे 'सामान्य माणूस' हा शब्द मी 'क्षुद्र सांसारिक गोष्टीत गुरफटलेले, भौतिक सुखांसाठीच जगणारे लोक' अशा अर्थाने वापरत आहे. सामान्य माणसाच्या सुखदुःखाच्या कल्पना आणि योग्याच्या सुखदुःखाच्या कल्पना यात बरीच तफावत असते. जर योगी अशा लोकांत मिसळला तर त्याच्यावर कळत-नकळत वाईट संस्कार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी आयुष्यभर नाही तरी निदान साधनेत तीव्रता असताना आणि कुंडलिनी जागरणाच्या वेळीतरी साधकाने सामान्य लोकांचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी जमेल तेव्हा दैनंदिन आयुष्यातून बाजूला होवून एकांतात अभ्यास केला पाहिजे. एकप्रकारे Yoga Vacation म्हणाना.

चंचलता

योगाभ्यासात सहावा अडथळा आहे चंचलता. चंचलता दोन प्रकारची असते - शारीरिक आणि मानसिक. काही साधकाना एकाच आसनात तासनतास बसता येत नाही. पाय आखडतात. आसन स्थिर रहात नाही. परिणामी ध्यान नीट लागत नाही. म्हणूनच योगशास्त्रात आसनसिद्धी करण्याचा सल्ला दिला जातो. आसनसिद्धी म्हणजे एकाच आसनात (सुखासन, पद्मासन इत्यादी) कमीत कमी तीन तास (काही ठिकाणी हा वेळ 12 तास सांगितला जातो) बसता येणे. काही वेळा बसण्याचे आसन (कांबळे, शाल, मृगाजिन वैगरे) नीट नसते. अति टणक आसनामुळेही चंचलता येते. मनात जर भौतिक सुखांचे विचार असतील तर मन चंचल बनते. काहि वेळा योग्याला स्वतःचा साधनेविषयी, गुरूच्या शिकवणीविषयी शंका वाटू लागते. अशा वेळीही मन चंचल बनते. परिणामतः साधना नीट होत नाही.

वरील सहा घटकांचा कमीतकमी उपद्रव होईल असे पाहणे हे प्रत्येक साधकाचे हे कर्तव्य आहे. ज्यायोगे साधनेत निर्विघ्नपणे पुढे सरकता येईल.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 01 January 2010


Tags : योग अध्यात्म हठयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला