Untitled 1

दिवाळीच्या शुभेच्छा आणि एक गोष्ट

आमच्या सर्व वाचकांना आणि योग साधकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!  तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयू, आरोग्य, एश्चर्य आणि आनंद प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

दीपावलीच्या शुभेच्छांबरोबरच गोरक्षनाथांची एक छोटी गोष्ट सांगणार आहे...

मच्छिंद्रनाथ योगी असूनसुद्धा दैववश मैनावती राणी बरोबर संसारात गुंतले. गोरक्षनाथांनी आपल्या गुरूला सोडवून आणण्याचा चंग बांधला. मैनावती राणी स्त्रीराज्याची स्वामीनी. त्यामुळे राज्यात फक्त स्त्रियांना प्रवेश. गोरक्षनाथांनी मग स्त्रीवेश धारण करून एका नृत्यांगनेबरोबर स्त्रीराज्यात प्रवेश केला. मच्छिंद्रनाथ राणीबरोबर संसारसुख भोगण्यात रंगले होते. गोरक्षनाथांनी मृदुंग वादनाची जबाबदारी स्वीकारली. राजसभेत मच्छिंद्रनाथ राणीबरोबर नृत्याचा आस्वाद घेण्यासाठी आले. नृत्य सुरू झाल्यावर गोरक्षनाथांनी मृदुंगावर "चलो मच्छिंद्र गोरख आया"  असे बोल वारंवार काढण्यास सुरवात केली. मच्छिंद्रनाथ चपापले. आता आपला शिष्य आपल्याला घेऊन जाणार आणि आपला सुखोपभोग संपणार हे त्यांना लक्षात आले. राणीने आणि मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना नाना प्रकारे भुलवण्याचा प्रयत्न केला पण गोरक्ष काही केल्या बधले नाहीत. मच्छिंद्रनाथांना घेऊन एक दिवस त्यांनी स्त्रीराज्याला रामराम ठोकला. मच्छिंद्रनाथ सोडूना जात असताना राणीला खूप दुःख झाले. तीने प्रेमाने एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली. कधी गरज लागली तर वापरता येईल या विचाराने मच्छिंद्रनाथांनी ती ठेऊन घेतली. गोरक्षनाथांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता.

मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्त्रीराज्य सोडून जंगलात प्रवेशले. मच्छिंद्रनाथ क्षणोक्षणी घाबरेघुबरे होऊन, आपली झोळी उराशी कवटाळून गोरक्षनाथांना विचारू लागले की येथे चोर-लुटारूंचे भय तर नाही ना. गोरक्षांना संशय आला. योगशिरोमणी असलेल्या आपल्या गुरूंना अचानक भय कसे काय वाटू लागले हे त्यांना कळेना. एके ठिकाणी मच्छिंद्रनाथ पाणी पिण्यासाठी तलावावर गेले. ते गेल्यावर गोरक्षनाथांनी त्यांची झोळी उघडून पाहिली आणि भयाचे कारण त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ती सोन्याची वीट जंगलात भिरकावून दिली आणि त्याच्याच वजनाचा एका दगड झोळीमध्ये ठेवला. मच्छिंद्रनाथ परतल्यावर गुरू-शिष्य पुढच्या प्रवासाला लागले. मच्छिंद्रनाथ परत परत गोरक्षाला चोरभयाविषयी विचारू लागले. गोरक्ष हसून उत्तरले, "गुरूजी! आता कसले भय? भय तर मागेच राहिले." गोरक्षनाथांच्या उत्तराने मच्छिंद्रनाथांना संशय आला. त्यांनी झोळी उघडून पाहिली तर सोन्याची वीट गायब. ते खूप संतापले. गोरक्षाला "तू माझे सोने चोरलेस" असे म्हणून शिव्याशाप देऊ लागले. गोरक्ष म्हणाले, "गुरूजी! आपणा कोण आहोत ते लक्षात घ्या. आपण योगी. आपल्याला ही सोन्याचांदीची ब्याद कशाला पाहिजे." तरी मच्छिंद्रनाथांना काही पटेना. ते अधिकच रागावू लागले. भ्रमिष्टासारखे "माझे सोने गेले हो" असा आक्रोश करू लागले. ते पाहून गोरक्षांनी त्यांना हाताला धरून बसवले आणि स्वतः समोरच्या पर्वतावर चढले. पर्वतमाथ्यावर पोहोचल्यावर त्यांनी तेथे लघुशंका केली आणि काय आश्चर्य तो अख्खा पर्वतच सोन्याचा झाला. गोरक्ष खाली उतरून आपल्या गुरूकडे आले. म्हणाले, "गुरूजी! तुम्हाला पाहिजे तेवढे सोने घ्या." आपल्या शिष्याचे योगासामर्थ्य आणि वैराग्य पाहून मच्छिंद्रनाथांनी अत्यानंदाने गोरक्षनाथांना मिठी मारली. पर्वतावर थुंकत ते म्हणाले, "गोरक्षा! सोन्यासारखा शिष्योत्तम माझ्याकडे असताना मला अन्य सोन्याची गरजच काय? माझी शिकवण तुला कितपत कळली आहे त्याची परीक्षा घ्यावी म्हणून मी हे सर्व केले." गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांच्या चरणावर मस्तक ठेवले.

दिवाळी म्हणजे आनंदाचा, मौजमजेचा आणि एश्चर्याचा सण. साधारणतः हे एश्चर्य नवीन खरेदी, नवे कपडे, सोनं-चांदीची खरेदी, रोषणाई, फटाके अशा प्रकाराने साजरे केले जाते. ज्यांना दिवाळी अशा प्रकारे साजरी करायची असेल त्यांनी जरूर करावी. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे पण त्याचबरोबर आपापल्या आयुष्यात, आपापल्या कार्यक्षेत्रात गोरक्षनाथांसारखे "गुणांचे ऐश्चर्य" कसे कमावता येईल हे ही आपण सर्वांनी पाहायला हवे. त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. जगद्नियंता सदाशिव आपणा सर्वांना तशी प्रेरणा देवो हीच त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 03 November 2010


Tags : कथा नाथ