Learn the royal path of Ajapa Yoga. Course conducted by Bipin Joshi in Thane. Read more...

Untitled 1

डॉट नेट डेव्हलपर्स साठी "चत्वार वाचा"

आपण सगळ्यांनी कधीनाकधी मनाचे श्लोक वाचलेले आहेत. त्यांतील "नमू शारदा मूळ चत्वार वाचा" हे ही आपल्याला अगदी तोंडपाठ आहे. परंतु या "चत्वार वाचा" चा योगगर्भ अर्थ लोकांना क्वचितच माहित असतो. हा अर्थ नीट समजून घेतल्यावर ही संकल्पना किती खोलवर रुजलेली आहे ते आपल्याला कळतं.

चत्वार वाचा म्हणजे चार प्रकारची वाणी. वाणी म्हणजे बोलणं किंवा आवाज असा सर्वसाधारण अर्थ घेतला जातो. पण अजपा योगशास्त्रानुसार वाणी म्हणजे स्पंदन असा गूढगम्य अर्थ आहे. शैव दर्शनावर आधारित शिवसूत्र किंवा स्पंदकारीका वगैरे जे ग्रंथ आहेत त्यात याच स्पंदन शास्त्राचे विश्लेषण केलेलं आहे.

अशी ही वाणी चार प्रकारात विभागलेली आहे - परा, पश्यंती, मध्यमा, आणि वैखरी. यांतील परावाणी सर्वात सूक्ष्म असून वैखरी सर्वात स्थूल स्वरूपाची आहे. परामात्म्याचे "शिव-शक्ती" रूपातील जे मूळ स्पंदन ते म्हणजे परावाणी. आपण मुखावाटे जे बोलतो ती वाणी म्हणजे वैखरी वाणी. म्हणजे बघा परमात्मा ते मानव पिंडातून उमटणारा प्रत्यक्ष शब्द ही एकाच वाणीची भिन्न स्वरूप आहेत. या वाणीची देवता म्हणजे सरस्वती किंवा शारदा.

अजपा योगशास्त्रानुसार या चार वाणींचा संबंध सुषुम्ना मार्गावरील चक्रांशी आहे. वैखरी वाणी मुखातून प्रकट होते हे आत्ताच आपण पाहिले. वैखारीच्या आधीचे आणि वैखरीपेक्षा सूक्ष्म असे रूप म्हणजे मध्यमा. मध्यमा वाणीचा संबंध विशुद्ध चक्राशी आहे. त्याचप्रमाणे पश्यंती आणि परा वाणीचा संबंध अनुक्रमे अनाहत आणि मणिपूर चक्राशी आहे. काही योगग्रंथांत या वाणी आणि चक्रांच्या संबंधात थोडा भेद आहे पण सांगायचा भाग असा की मुखातून व्यक्त होणारी वाणी ही प्रत्यक्षात कुंडलिनी शक्तीचीच एक अभिव्यक्ती आहे.

शिव्या-शाप देऊ नयेत, तोंडी अर्वाच्य भाषा असू नये, मितभाषी असावे असे जे सांगितले जाते त्याचे अध्यात्म दृष्टीने पहाता महत्व आता लक्षात येईल. विचार करा की कुंडलिनी शक्तीची जी अभिव्यक्ती आहे ती वाणी अशा वाईट प्रकारे का वाया घालवावी. आपण जे बोलतो ती वरकरणी जरी सहज घडणारी एका शारीरिक क्रिया वाटत असली तरी त्यामागे प्रत्यक्ष कुंडलिनी शक्तीचे अधिष्ठान आहे.  म्हणून वाणीचा अपव्यय आणि दुरुपयोग टाळून ती वाणी परमेश्वराचे नाम घेण्यात खर्ची घालावी.

तुमच्यापैकी जे योगमार्गावर नवीन आहेत, प्रत्यक्ष साधनेचा अनुभव अजून घ्यायचा आहे त्यांना एकच वाणी चक्रांच्या आणि कुंडलिनीच्या माध्यमातून कशी काय रुपांतरीत होते असा प्रश्न कदाचित पडेल. सहज म्हणून डॉट नेट मधील एक उदाहरण देतो म्हणजे कल्पना करता येईल की हे कसे काय होत असेल ते.

खालील C# कोड बघा. तुम्हा सर्व डॉट नेट डेव्हलपर्स ना तो नक्कीच परिचित असेल.

हा सोर्स कोड लिहिण्यासाठी आपण इंग्रजी मधील alphabets, numbers आणि चिन्ह यांचा उपयोग करतो. जेंव्हा आपण हा सोर्स कोड कंपाईल करतो तेंव्हा तो MSIL मध्ये रुपांतरीत होतो. वरील कोड MSIL मध्ये खालीलप्रमाणे दिसेल :

 

Operating System ला अर्थातच MSIL काही कळत नाही. तो कळण्यासाठी MSIL चे रुपांतर बायनरीत करावे लागते. वर दिलेल्या सोर्स कोड मध्ये जे "Hello World" ते बायनरीमध्ये असे दिसेल :

 

आता पहा. आपला मूळ सोर्स कोड कसा "स्थूल" स्वरूपात होता आणि तो शेवटी कसा "सूक्ष्म" स्वरूपात रुपांतरीत झाला. वाणीचे चार प्रकार सुद्धा असेच रुपांतर असतं.

असो.

नेहमी जे सांगतो तेच परत सांगतो आणि थांबतो - फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये धन्यता मानू नका. ते भौतिक आयुष्याचं साधन आहे. त्यापुढे जाऊन परमेश्वराचं "प्रॉग्रामिंग" ओळखण्याचा आणि प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करा.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 Feb 2018