Untitled 1

कासवाचा दृष्टांत


(Image used for representation purpose only. Image source : Wikipedia.)

सध्या सोशल नेटवर्किंगवर आणि वर्तमानपत्रांत ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्य बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ती कासव किनाऱ्यावर कशी येतात, अंडी कशी घालतात, त्या अंड्यांतून पिल्लं कशी बाहेर पडतात वगैरे शास्त्रीय माहिती अनेक ठिकाणी वाचायला मिळत आहे. ही माहिती वाचत असतांना मला नेहमी आठवतो तो अध्यात्मशास्त्रात सांगितला जाणारा कासवाचा दृष्टांत...

येथे एक लक्षात घेतले पाहिजे की हा दृष्टांत जुन्या काळच्या समजुतीवर आधारित आहे. आज आपल्याला या कासावांविषयी आणि त्यांच्या जीवनशैलीविषयी सखोल शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे विज्ञाननिष्ठ मनाला कदाचित तो पटणार नाही. परंतु त्यांत दडलेले आध्यात्मिक रहस्य आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे.

कासवाची मादी अंडी घालायची वेळ आली की समुद्र किनारी येते. तेथे वाळूत खड्डा करून त्यात ती आपली अंडी घालते. एक दिवस ती अंडी फुटून त्यांतून इवली इवली कासवाची पिल्लं बाहेर येतात. अंड्यातून बाहेर येताक्षणी ती निसर्ग प्रेरणेने समुद्राकडे धाव घेतात. आपल्या आईकडे ढुंकूनही न पहाता इवल्या इवल्या पायांनी वाळू कापत कापत समुद्रात जातात आणि मग अथांग सागरात गुडूप होतात.

सर्वसाधारण सर्वच प्राण्यामध्ये असं दिसून येतं की पिल्लं जन्माला आल्यावर काही काळ तरी ती आपल्या आईच्या सहवासात असतात. आई त्यांचं पालन पोषण करते. त्यांना प्रेमाने अन्न भरवते. त्यांची काळजी घेते. प्रतिकूल परिस्थिती पासून त्यांचं संरक्षण करते. त्या मादी कासवाच्या बाबतीत मात्र हे सुख नसतं. कारण अंड्यातून बाहेर पडलेली ती पिल्लं त्यांच्या आईच्या छत्रछायेखाली येत नाहीत. अथांग समुद्रात ती गुडूप होऊन जातात.

ती पिल्लं जरी आपल्या आईपासून दुरावत असली तरी आई ती शेवटी आई. त्या कासवाच्या मादीला आपल्या पिल्लाविषयी हृदयी वात्सल्यभाव ओतप्रोत भरलेला असतो. अंड्यांतून बाहेर पडलेली ती पिल्लं जेंव्हा सागराच्या कुशीत जाण्यासाठी जात असतात तेंव्हा त्यांची आई त्यांच्याकडे अगदी प्रेमार्द नजरेने बघत असते. तिच्या नजरेत एवढे प्रेम आणि वात्सल्य भरलेले असतं की त्याच्या जोरावरच त्या पिल्लांचं पोषण होतं. ती जणू आपल्या बाळांना सांगत असते - "जा माझ्या बाळांनो, सागराच्या विशाल उदरात तुम्हाला निवारा आणि संरक्षण लाभो. मोठे व्हा. सुखी व्हा. "

ज्ञानेश्वरी मध्ये कासवाचा हा दृष्टांत काही ठिकाणी आलेला आहे. त्या संबंधींच्या ओव्या आणि त्यांचा माझ्या अल्पमती प्रमाणे अर्थ थोडक्यात खाली देत आहे.

तेराव्या अध्यायात (म्हणजे क्षेत्रक्षेत्रज्ञयोग) संत ज्ञानेश्वर म्हणतात -

अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण ।
करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं ।
सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥
मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना ।

कुर्मी अर्थात कासवाची मादी ज्याप्रमाणे स्तनपान न देता केवळ प्रेमाने आपल्या पिल्लांना न्याहाळून त्यांचे पोषण करते त्याचप्रमाणे या शरीरात जी आत्म्याच्या संगतीने पंचमहाभूतात्मक जड शरीराला सजीव बनवते तिलाच चेतना अर्थात प्राणशक्ती असे म्हणतात.

त्यानंतर सोळाव्या अध्यायात (म्हणजे दैवासुरसंपत्तिविभागयोग) ते म्हणतात -

डोळ्यां प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी ।
तैसीं भूतमात्रीं राहटी । मवाळ ते ॥

प्रिय वस्तू पहात असता जसे डोळ्यांत प्रेम आणि आपुलकी असते किंवा कुर्मी ज्याप्रमाणे आपल्या वात्सल्य दृष्टीने पिल्लांचे पोषण करते त्याप्रमाणे सज्जनांची प्रेममय दृष्टी सर्ब भूतमात्रांच्या ठिकाणी असते.

शेवटी अठराव्या अध्यायात (म्हणजे मोक्षसंन्यासयोग ) ते म्हणतात -

कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया । कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ।

अर्जुन भाग्यवानच म्हटला पाहीजे. कुर्मीच्या नजरेला ज्याप्रमाणे आपली पिल्ले पहाताच पान्हा फुटतो आणि ती पिल्ले लगेच तृप्त होतात. किंवा चातक पक्षासाठी आकाश पाणी साठवत असते आणि त्याच्या चोचीत घालते त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला आत्मज्ञान प्राप्त झाले.

अजपा योगमार्गावर सद्गुरू साधकाला असेच कूर्मदृष्टीने सांभाळत असतात. साधक नवखा असतो. तो अध्यात्ममार्गावर चुकतो, धडपडतो, प्रसंगी साधना खंडित करतो. षडरीपूंनी वारंवार घेरला जातो. असे असली तरी सद्गुरू मात्र साधकाला वात्सल्यमय दृष्टीने पहात असतात. त्याला सावरतात. अध्यात्ममार्गावर त्याचा सांभाळ आणि पोषण करत असतात. साधकाने श्रद्धा आणि सबुरी मात्र ठेवायला हवी.

सर्व वाचकांना आपापल्या सद्गुरुंच्या कुर्मदृष्टीचा यथेच्छ् लाभ घडो या सदिच्छेसह विराम घेतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 12 Apr 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates