Untitled 1
"दुसऱ्या" कुंडलिनीची गोष्ट
कुंडलिनी योगमार्गावर जेंव्हा एखादा नवीन साधक येतो तेंव्हा त्याच्या मनावर कळत
नकळत काही ठराविक साचेबद्ध गोष्टींचा भडीमार होत असतो. कोण एक कुंडलिनी नामक शक्ती
मेरुदंडाच्या खालील भागात असणाऱ्या मुलाधार नामक चक्रात निवास करत असते. त्या
निद्रिस्त शक्तीला योगसाधनेने जागृत करून मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर वगैरे
चक्रांतून भेदून सहस्रारात घेऊन जाणे म्हणजे कुंडलिनी योग अशी त्याची ढोबळमानाने
समजूत होत असते. आता या सगळ्या गोष्टींत काही चुकीचे आहे असं अजिबात नाही. हे सर्व
बरोबरच आहे. परंतु ही नाण्याची केवळ एक बाजू आहे.
समस्त सृष्टी युगुलांनी भरलेली आहे. रात्र-दिवस, प्रकाश-अंधार, सूर्य-चंद्र,
स्त्री-पुरुष, शिव-शक्ती, ओलं-सुकं, निद्रिस्त-जागृत, कृष्ण-धवल अशा अनेक जोड्या
आपल्याला सांगता येतील. अगदी त्याचप्रमाणे जगदंबा कुंडलिनी शक्तीची सुद्धा जोडी
आहे. वर कुंडलिनी योगाची जी ढोबळ रूपरेषा सांगितली आहे तीला आपण येथे आपल्या
सोयीसाठी "पहिली" कुंडलिनी म्हणू. मी मुद्दामच येथे फार किचकट सखोल विवरणात जात
नाहीये कारण केवळ त्या विषयाकडे सूक्ष्म निर्देश करणे एवढंच या लेखाचं उद्दिष्ट
आहे.
तर सांगायची गोष्ट अशी की ही "पहिली" कुंडलिनी ही मोक्ष प्रधान आहे. एकादा
योगाभ्यासी साधक जेंव्हा या मार्गावर येतो तेंव्हा तो निकराने कुंडलिनी जागृत
करण्याच्या मागे लागतो. शुद्धीक्रिया, आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा, ध्यान इत्यादी
क्रियांनी तो या सुप्त शक्तीला जणू डिवचतो. एक दिवस ही निद्रिस्त भुजांगी मग जागी
होते आणि निद्रा मोडल्याने काहीशी रागावलेली ही पंचभूतांची स्वामिनी रागाने फुत्कार
टाकू लागते. जेंव्हा योगाभ्यासी तिला न जुमानता तिला सुषुम्ना मार्गाने पुढे ढकलतो
तेंव्हा ती पंचमहाभूतांचे शोधन सुरु करते. एका एका चक्राचे बांध ओलांडत ही महामाया
सहस्रारातील आपल्या प्रियकराला भेटायला आतुर झालेली असते.
या कुंडलिनी शक्तीच्या जागरणाने काय होतं तर साधकात वैराग्याचा उदय होतो.
वैराग्याचा उदय म्हणजे काही लगेच राख फासून हिमालयात निघून जाणं असं नाही तर साधकात
भोगांपासून दूर जाण्याची प्रबल इच्छा आपसूकच दृढ होते. त्याच्या आयुष्यात
भोगांविषयीची अनासक्ती स्पष्ट दिसून येते. त्याची साधना अजून दृढावते. कुंडलिनी
मार्गक्रमण करतच असते. साधक आपल्या साधनेत मशगुल असतो. एक दिवस ध्यानीमनी नसतांना
त्या साधकाला एक विलक्षण गोष्ट कळते - "अरेच्चा! आपण आजवर एकच कुंडलिनी शक्ती आहे
असं समजत होतो. येथे तर दोन कुंडलिनी आहेत."
ही "दुसऱ्या" कुंडलिनीची झालेली ओळख साधकाच्या आध्यात्मिक आयुष्यातील एक
महत्वाचा टर्निंग पॉइंट असतो. मी याला टर्निंग पॉइंट म्हणतोय ते अशा साठी की ही
"दुसरी" कुंडलिनी त्याला एक विलक्षण गोष्ट शिकवते. "पहिल्या" कुंडलिनी सारखी ती
त्याला प्राराब्धतील भौतिक भोगांपासून दूर लोटत नाही. ती त्याला समस्त भौतिक
भोगांनी वेढले असतांना सुद्धा त्यांपासून अलिप्त कसं राहायचं ते शिकवते. अनेक
साधकांची चांगले-वाईट प्रारब्ध भोग भोगत असतांना फार घुसमट होते. भौतिक भोग आणि
आध्यात्मिक आस यांचा न संपणारा झगडा त्याच्या अंतरंगात सुरु असतो. ही "दुसरी"
कुंडलिनी साधकाला अशा आंतरिक विरोधाभासापासून अलगद दूर ठेवते. मग त्या साधकाला आपण
जंगलात आहो की राज महालात त्याने काही फरक पडत नाही. या "दुसऱ्या"
कुंडलिनीशी ओळख झाली की साधकाला भगवान दत्तात्रेय किंवा सिद्ध मच्छिंद्रनाथ यांच्या
सारखे अवतारी "कधी योगी, कधी भोगी" कसे काय बनत असावेत त्याचे रहस्य कळू लागते.
गंमत अशी की बहुतेक शास्त्र ग्रंथांत "पहिल्या" कुंडलिनी विषयी भरभरून लिहिलेलं
आहे परंतु त्या "दुसऱ्या" कुंडलिनी विषयी मात्र फारच त्रोटक निर्देश केलेला आहे.
कदाचित तुम्हाला असं वाटेल की मग काय, ती "दुसरी" कुंडलिनीच बरी आहे की! "पहिलीची"
काय गरज?! पण तसं नाही. "पहिली" हस्तगत करावी तेंव्हाच "दुसरीशी" ओळख होते. थेट
दुसरी हस्तगत होणे शक्य नाही.
असो. हे "पहिली-दुसरी" आख्यान पुष्कळ झालं. या मार्गावर नेटाने चालत राहिलात तर
एक दिवस मी काय म्हणतोय ते नक्की कळेल तुम्हाला. भविष्यात कधीतरी या विषयी पुन्हा
विस्ताराने आणि अजपा साधनेच्या अनुषंगाने सांगेन. आज इतकंच पुरे.
सहस्र दिपोत्सवांचे तेजही जिच्यापुढे फिके वाटेल अशी प्रकाश स्वरूपा जगदंबा
कुंडलिनी सर्व वाचकांना भोग आणि मोक्ष प्रदान करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला
विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम