Untitled 1

महाशिवरात्री निमित्त मूलमंत्र जप साधना

भगवान सदाशिव म्हणजे देवांचा देव, समस्त गुरुमंडलाचाही आदिगुरु. कुंडलिनी योगशास्त्रातील कोणत्याही साधनेत सफलता मिळवायची असेल तर शिवकृपेशिवाय ती मिळणे शक्य नाही. आता भगवान शंकराची कृपा प्राप्त कशी करायची? मार्ग अनेक आहेत - भक्ती, योग, मंत्र, स्तोत्र आणि अजूनही बरेच. येथे एक अशी योगमार्गी साधना सांगत आहे जी मंत्र, चक्र, कुंडलिनी आणि भगवान शिव यांची आवड असणाऱ्याना नक्की आवडेल. केवळ आवडणारच नाही तर शीघ्र फलदायीही ठरेल.

येत्या ४ मार्च रोजी महाशिवरात्र आहे. येथे अशी एक साधना विषद करणार आहे की ज्यामुळे ईश्वरी तत्वाशी आणि गुरुतत्वाशी "कनेक्शन" जोडले जाण्यास मदत होईल. तुम्हाला कदाचित माहित असेल की प्रत्येक देवतेचा एक "मूलमंत्र" असतो. त्या दैवतेच्या कोणत्याही अन्य काम्यमंत्राची साधना करण्यापूर्वी मूलमंत्राची साधना करणे मंत्रशास्त्रानुसार आवश्यक मानले गेले आहे. मी जी साधना सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला भगवान सदाशिवाचा मूलमंत्र माहित असणे आवश्यक आहे. त्या मूलमंत्राला आदी आणि अंती ओमकाराचे संपुट लावायचे आहे. शेवटची दोन वाक्य नीट परत वाचा.

मी येथे मंत्र मुदाम प्रकटपणे देत नाहीये. अध्यात्म मार्गावर अशा साधना करतांना स्वतः जरा कष्ट / मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. सगळंच आयत मिळालं की त्याची किंमत कळत नाही आणि मजाही येत नाही. तेंव्हा एखाद्या जाणकाराकडून किंवा शास्त्रशुद्ध ग्रंथातून मंत्र स्वतः मिळवा आणि नीटपणे मुखोद्गत करा. त्यांचे नीट उच्चार शिकून घ्या. कोणत्या अक्षरावर किती जोर द्यायचा ते नीट आत्मसात करा. मंत्र शास्त्रानुसार मूलमंत्राचा कमीतकमी सव्वा लाख जप केला जातो. जपाच्या एक-दशांश हवनही केले जाते.

आजकालच्या बहुतेक साधकांना एवढ्या मोठ्या संख्येने जप आणि हवन वगैरे करणे जमत नाही. त्यामुळे तो प्रकार मी येथे सांगणार नाही. येथे "अजपा गायत्री" च्या साक्षीने या मूलमंत्रांचा जप करण्याचा एक प्रकार मी सांगणार आहे. जप मोजण्यासाठी तुम्हाला रुद्राक्षाची माळ लागेल. जर नसेल तर काही दिवस आधीच आणून तिची शुद्धी करून ठेवा. म्हणजे आयत्या वेळी घाई होणार नाही.

महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शुभ काळी ही साधना करायची आहे. हा शुभ काळ कोणता ते तुम्ही एखाद्या दिनदर्शिकेतून किंवा पंचांगातून शोधा. मी येथे सांगत नाही. एकदा ही वेळ ठरली की मग त्यावेळी हात-पाय धुवा,खळखळून चुळा भरा. तोंडात अन्नकण वगैरे बिलकुल असणार नाहीत याची खात्री करा आणि आसन टाका. प्रथम डोळे मिटून एक-दोन मिनिटे स्वस्थ बसा. मन शांत होऊ दे. त्यानंतर "अजपा जप" करण्यस सुरवात करा. साधारणतः अजपा मोजला जात नाही पण यादिवशी शुभकालाचे बंधन असल्याने हा अजपा जप माळेवर मोजा. एक माला झाली की अजपा साधना थांबवा आणि मुख्य साधना - मूलमंत्र जप - सुरु करा.

हा मूलमंत्राचा जप तुम्हाला विशिष्ठ प्रकारे करायचा आहे. हा विशिष्ठ प्रकार म्हणजे चक्रांच्या अनुसंधानासाहित जप करणे. प्रथमतः भगवान शंकराच्या मूलमंत्राने प्रत्येक चक्रावर "अभिषेक" करत करत सहस्रारापर्यंत जा. प्रत्येक चक्रावर एक माळा जप झाला पाहिजे. कुंडलिनी योगशास्त्रात सहस्त्रार चक्र हे गुरुचरणांचे स्थान मानले गेले आहे. त्या ठिकाणी पोहोचल्यावर भगवान शंकराला गुरु मानून "अमृताच्या तळ्यात" केलेला सर्व जप समर्पित करा.

ही मुख्य साधना संपली की परत सुरावातीप्रमाणे एका माळा "अजपा जप" करा. सर्व जप संपल्यावर दोन-पाच मिनिटे स्वस्थ बसा आणि मगच आसन उचला.

येथे तुमची महाशिवरात्रीची साधना संपली. सलग ४० किंवा ५१ दिवस जर ही साधना करता आली तर अतिउत्तम अथवा प्रत्येक महाशिवरात्रीला तरी ही साधना परत करावी. अर्थात तुमची दैनंदिन जी काही साधना असेल ती सुरूच असुद्या.

येऊ घातलेल्या महाशिवरात्रीच्या शुभसमयी आदिनाथाच्या आशीर्वादाने सर्व वाचकांची आधात्मिक प्रगती होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 February 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates