Untitled 1

हठयोगाचे प्रयोजन राजयोगाच्या प्राप्तीकरता

येत्या शुक्रवारी म्हणजे २१ जून २०१९ रोजी आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे. योग म्हटलं की आजच्या काळात लोकांना प्रामुख्याने आठवतात ती हठयोगातील योगासनं आणि प्राणायाम. आधुनिक काळातील सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या लोकांना "योगा" आवडतो तो त्याच्या "फिटनेस बेनिफिट्स" मुळे. पारंपारिक हठयोगाचे आरोग्यासाठी फायदे तर आहेतच परंतु प्राचीनकाळापासून हठयोग हा राजयोगाची प्राप्ती करण्यासाठीची एक पायरी म्हणून ओळखला गेला आहे.

हठयोग प्रदीपिकेचा कर्ता योगी स्वात्माराम नक्की कोण होता याविषयी संशोधकांमध्ये एकमत नाही परंतु त्याचा नाथ संप्रदायाशी घनिष्ठ संबंध असावा हे त्याने ग्रंथाच्या सुरवातीला दिलेल्या परंपरेवरून स्पष्ट दिसून येते. स्वात्माराम हठयोग प्रदिपिकेच्या चौथ्या अध्यायात म्हणतो -

सर्वे हठ-लयोपाया राजयोगस्य सिद्धये।
राज-योग-समारूढः पुरुषः काल-वञ्चकः॥

याचा अर्थ असा की हठयोगातील आणि लययोगातील सर्व क्रिया ह्या राजयोगाची सिद्धी होण्याकरता आहेत. योगी राजयोगाच्या भूमीवर आरूढ झाल्यावर काळावर जय मिळवतो.

आता स्वात्मारामाला अभिप्रेत असलेला राजयोग म्हणजे काय आहे तर तो असा आहे -

राजयोगः समाधिश्च उन्मनी च मनोन्मनी।
अमरत्वं लयस् तत्त्वं शून्याशून्यं परं पदम्॥
अमनस्कं तथाद्वैतं निरालम्बं निरञ्जनम्।
जीवन्मुक्तिश् च सहजा तुर्या चेत्य् एक-वाचकाः॥

तो म्हणतो राजयोग, समाधी, उन्मनी, मनोन्मनी, अमरत्व, तत्वलय, शून्यावस्था, परमपद, अमनस्क स्थिती, अद्वैत, निरालंब स्थिती, निरंजनावस्था, जीवनमुक्ती, सहजावस्था, तुर्या हे जे सगळे सगळे शब्द वापरले जातात ते सगळे एकाच अवस्थेचे द्योतक आहेत. ती अवस्था प्राप्त करण्यासाठी हठयोग एक साधन आहे.

हठयोग आणि राजयोग यांचा संबंध कसा आहे याविषयी स्वात्माराम फार सुरेख विवेचन करतो. तो म्हणतो -

तत्त्वं बीजं हठः क्षेत्रम् औदासीन्यं जलं त्रिभिः।
उन्मनी कल्प-लतिका सद्य एव प्रवर्तते॥

मन म्हणजे जणू बीज आहे. हठयोग म्हणजे जणू जमीन आहे. औदासिन्य अर्थात वैराग्य म्हणजे जणू पाणी. हठयोगरुपी जमीनीत मनरूपी बीज लावून त्याला वैराग्यरुपी पाणी घातल्यावर उन्मनी नावाचा कल्पवृक्ष तरारून येतो. उन्मनी म्हणजे राजयोग आणि अन्य संज्ञांनी वर्णिलेली अवस्था.

तात्पर्य हे की हठयोगातील चित्रविचित्र आणि कठीण-कठीण योगासने, किंवा नौली सारख्या क्रिया यांमध्येच अडकून न रहाता योगशास्त्राचे उद्दिष्ट हे शरीराकडून मनाकडे आणि मनाकडून तुर्येकडे वाटचाल असे आहे हे लक्षात घ्यायला हवे. भगवान सदाशिव, अवधूत दत्तात्रेय, नवनाथ आणि चौरांशी सिद्ध या गुरुमंडलाचा भक्कम कृपाशीर्वाद लाभलेली अजपा साधना हा या मार्गावरचा सुगम आणि सुलभ दुवा आहे.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचकांवर जगद्नियन्त्या श्रीकंठाचा वरदहस्त सदैव राहो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 17 June 2019