पाच मिनिटांच्या पाच साधना

पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग ४ - चक्र धारणा)

कुंडलिनी योगशास्त्रानुसार मेरूदंडाच्या आतून सुषुम्ना नामक एक प्राणनाडी गेलेली आहे जी च्या मार्गावर सहा महत्वाचे बिन्दु किंवा स्थानं आहेत. या बिंदूंना चक्रं म्हटलं जाते. चक्र धारणेच्या या प्रकारात या सहा चक्रांना हळुवारपणे जागृत केले जाते.  ही चक्रे प्राणाची मुख्य स्थाने असल्याने त्यावरील ध्यानाने शरीर आणि मनावर सुपरिणाम घडून येतो. कुंडलिनी योगशास्त्रात चक्र, नाड्या आणि प्राण ही संकल्पना खूपच विस्ताराने वर्णन केली आहे. त्या विषयाच्या फार खोलात न जाता ही साधना सोप्या प्रकारे कशी करायची ते येथे पाहणार आहोत.

 ही साधना करण्या आगोदर तुम्हाला वर उल्लेखलेल्या सहा चक्रांची स्थाने माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी हा लेख उपयुक्त ठरू शकेल. 

 • घरातल्या एखाद्या शांत खोलीत किंवा देवघरात साधंनेकरता आसन घाला. आसन म्हणून चादरीची चौपदरी घडी आणि त्यावर सूती पंचा वापरू शकता.
 • डोळे मिटून शांत चित्ताने क्षणभर बसा.
 • आता शरीराला आतून बघण्याचा प्रयत्न करा. अशी कल्पना करा की तुमची शरीर पोकळ असून त्वचा आवरणासाखी शरीराची बाह्याकृती दर्शवत आहे.
 • आता आपली जाणीव मेरूदंडाच्या तळाशी अर्थात मूलाधार चक्राशी ठेवा. येथे फक्त जाणीव ठेवणे पुरेसे आहे. फार एकाग्रता जमली नाही तरी हरकत नाही.
 • आता मूलाधार चक्राचा बीजमंत्र - लं - तीनदा मनातल्या मनात स्पष्टपणे उच्चारा. मनातल्या मनात मंत्रोच्चारण कठीण वाटत असेल तर सुरवातीला हळू आवाजात मोठयाने मंत्र म्हणायला हरकत नाही.
 • आता जाणीव मूलाधारा पासून काढून ती स्वाधिष्ठान चक्रा पाशी ठेवा. स्वाधिष्ठान चक्राचा मंत्र आहे वं. त्याचेही पूर्वीप्रमाणे तीनदा उच्चारण करा.
 • याच प्रकारे माणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा या चक्रांपाशी जाणीव ठेऊन त्यांचे मंत्र (जे अनुक्रमे रं, यं, हं आणि ॐ आहेत) तीन वेळा उच्चारा.
 • हे या साधनेचे अर्धे आवर्तन झाले.
 • अर्ध्या आवर्तंना नंतर तुम्ही आज्ञा चक्रापाशी पोहोचलेले असाल. आता जसे वर गेलात त्याच्या उलट क्रमाने खाली या - आज्ञा, विशुद्धी, अनाहत, माणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार. प्रत्येक ठिकाणी पूर्वीप्रमाणेच त्या त्या चक्राचा मंत्र म्हणा.
 • मूलाधाराशी परत आल्यावर या साधनेचे एक आवर्तन पूर्ण झाले.
 • अशी एका मागून एक आवर्तने १, ३, ५, ११, २१ अशा पटीत करा. सुरवातीला पाच मिनिटांत किती आवर्तने बसतात ते मोजा आणि मग तेवढी आवर्तने करा. जर अधिक वेळ देऊ शकत असाल तर आवर्तने वाढवा.

या साधनेने शरीरातील अंतःस्थ ग्रंथी आणि मज्जा रज्जु यांना प्राण शक्तीचा मुबलक पुरवठा होतो. परिणामी आरोग्यावर सुपरिणाम होतो. कुंडलिनी जागृतीसाठी ही साधना उपयुक्त आहे. ही सहा चक्रे म्हणजे पंचमहाभूते आणि मन यांचे जणू मुख्य वसतिस्थान आहेत. त्यामुळे पंचतत्वांची शुद्धीही या साधेनेत होते.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 15 March 2014


Tags : योग साधना