Untitled 1

दिवाळीच्या रात्री कुंडलिनी साधना

भारतीय अध्यात्मशास्त्रात मंत्रमय उपासनेला आत्यंतिक महत्व आहे. मूळ आगम-निगम शास्त्रात उगम असलेळ्या मंत्रशास्त्राचे महत्व ओळखून भगवान शंकराने सात्विक मंत्र आणि योग याची जुंपणी मंत्रयोगात केली. मंत्र म्हटला की त्याचा जप हा ओघाने आलाच आणि जप म्हटलं की त्यांद्वारे मंत्रातील चैतन्याची जागृतीही ओघाने आलीच. हठयोग किंवा राजयोगाच्या तुलनेत मंत्रयोग काहीसा मंदगतीचा मार्ग आहे. त्यामुळेच मंत्राचे जेंव्हा हजारो-लाखो वेळा विधीविधानासाहित उच्चारण करावे तेंव्हा कुठे तो सिद्ध होतो. यात लागणारा वेळ लक्षात घेता प्राचीन योग्यांनी काही असे उपाय शोधून काढले की ज्यांमुळे मंत्रसिद्धी शीघ्रगतीने होण्यास मदत मिळेल.

प्राचीन योग्यांनी असे काही कालखंड आपल्याला सांगितले आहेत की त्या मुहुर्तांवर मंत्रमय साधना शीघ्र गतीने फल प्रदान करते. अशाच मुहूर्तांपैकी काही खालील प्रमाणे :

१. महाशिवरात्री
२. कालरात्री अर्थात दिवाळीची रात्र
३. मोहरात्री अर्थात श्रीकृष्ण जन्माची रात्र
४. दारुणरात्री अर्थात होळीची रात्र
५. नवरात्री (वर्षातून चार वेळा नवरात्र येते. त्यांतील दोन गुप्त नवरात्री या कामी अधिक योग्य मानल्या जातात.)

वरील विशेष दिवसांत दिवाळीच्या रात्रीचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे प्रत्येक अजपा योग साधकाने वेळात वेळ काढून दिवाळीच्या रात्री आपल्या इष्ट मंत्राची उपासना विधिवत अवश्य केली पाहिजे. अजपाचा मूलमंत्र अर्थात "सोहं" किंवा "हंस" हा सुद्धा एक मंत्रच आहे त्यामुळे अजपा साधनाही त्यादिवशी रात्री न चुकता केली पाहिजे.

गंमत कशी आहे पहा. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव पण त्या दिवशी असते अमावास्या. प्रकाशाने या अमावास्येपासून जणू एक नवी सुरवात होत असते. अध्यात्म मार्गावरील साधकांसाठी हा आत्मपरीक्षणाचा मुहूर्त असतो. प्रत्येक साधकाने आपलंच आपण अवलोकन केलं पाहिजे की आपण या मार्गावर का आलो. आपली वाटचाल योग्य प्रकारे सुरु आहे का. जेंव्हा आपण साधना सुरु केली तेंव्हाचे आपण आणि आजचे आपण यांत किती फरक पडला आहे. हा फरक आपल्या अपेक्षेनुसार आहे का. अशा अनेक प्रश्नांकडे साधकाने प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने पाहिले पाहिजे. त्यातून आवश्यक तो बोध घेऊन पुढे गेले पाहिजे. दिवाळी सारखे मुहूर्त एक नवी उमेद, नवा उत्साह प्रदान करत असतात. त्याचा उपयोग करून अग्रेसर होणे साधकाच्या हिताचे ठरते.

माणूस हा नित्य नव्याच्या शोधात असतो. अध्यात्म मार्गावर सुद्धा तो नवनवीन गोष्टी शोधत असतो. नवीन गुरु, नवीन साधना, नवीन मार्ग, नवीन उपासना, नवीन विचारप्रणाली अशा अनेक नवीन गोष्टी त्याला खुणावत असतात. परंतु अध्यात्म मार्गाची खासियत अशी आहे की अनेक वर्षे एक मार्ग, एक विचारधारा, एक साधना घेऊन पुढे गेल्याशिवाय हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे हे नाविन्य चोखाळत असतांना आपला मूळ अध्यात्म-पिंड ज्यावर पोसला गेला आहे त्या साधनाप्रणालीशी असलेला आपला संबंध तुटत तर नाही आहे ना या कडे लक्ष ठेवले पाहिजे. मनाची ही नाविन्याची ओढ पुरवताना आपण धरसोडपणा तर करत नाही आहोत ना हे पाहिले पाहिजे. रोज नवनवीन साधनाप्रणाली चाखून पहाण्यापेक्षा आजवरची investment ज्या साधनाप्रणालीत केली तीलाच नवीन झळाळी देता येईल का. साधनेला आलेली मरगळ झटकून ती नवीन जोमाने करता येईल का याचा विचार केला पाहिजे.

कलियुगात मानवी आदर्श अतिशय ठिसूळ बनले आहेत. पाश्चात्यांच्या प्रभावाखाली योगमार्गाचे विद्रुपीकरण (distortion) आणि अति-सुलभीकरण (dilution) होत आहे. अशावेळी प्रत्येक साधकाने हे पाहिले की आपले अध्यात्मिक आदर्श नक्की काय आहेत. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी छान सांगितले आहे की आपण उच्च आदर्शाप्रत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला जमत नाही किंवा आवडत नाही म्हणून आदर्श खाली खेचू नये. सुदैवाने अनेक भारतीय योग्यांनी आत्यंतिक उच्च कोटीचा आदर्श आपल्या प्रत्यक्ष आचरणाने आपल्यापुढे ठेवलेला आहे. तो डोळ्यापुढे ठेऊन त्यानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे.

माणूस जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा तो पुढे कोण होणार हे कोणाला माहित नसते. त्याला जसे संस्कार मिळतील, तो स्वतःला जसे घडवेल तसं त्याचं आयुष्य घटीत होत असतं. पूर्वजन्मीच्या संचित संस्कारांच्या आणि या जन्मींच्या संस्कारांच्या मुशीत स्वप्रयत्नांच्या साथीने त्याचे आयुष्य आकार घेत असतं. कुंडलिनी जागृती हा योगजीवनाचा एक महत्वाचा टप्पा आहे हे तर खरंच परंतु नुसती कुंडलिनी जागृत होऊन काही कामाचे नाही. जर जागृत कुंडलिनीला योग्य वळण देता आलं नाही तर तिचे ऊर्ध्वगमन होण्याऐवजी अधःगमन होण्याची शक्यता असते. परिणामी साधक अधोगतीला प्राप्त होतो. जसं मागील जन्मीचे वाईट संस्कार या जन्मी अडथळा आणतात तसंच या जन्मींच्या साधनामार्गातील चुकीचे वर्तन नंतरच्या जन्मांत अडथळा बनते. साधकाच्या अंगात जर योगमार्गाला अपेक्षित अशी जीवनशैली भिनलेली असेल तर मग कुंडलिनी अचूक आपल्या गंतव्यस्थानाकडे आगेकूच करत रहाते. अन्यथा ही उर्जा "अधोमुखी" होऊन भौतिक स्तरांवरच अभिव्यक्त होत रहाते. आपल्याला या दोनपैकी काय हवंय याचा विचार ज्याचा त्याने करायचा असतो.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचक येऊ घातलेल्या दिवाळीच्या पवित्र मुहूर्तावर महासरस्वती-महालक्ष्मी-महाकाली स्वरूपा कुंडलिनीचा कृपाशीर्वाद प्राप्त करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 21 October 2019