Untitled 1

त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

भारतीय अध्यात्मशास्त्रात वेगवेगळ्या गद्य आणि पद्य ग्रंथांत हंस पक्षाचे रूपक वापरलेलं आहे. हंस पक्षी हा मुळातच राजबिंडा आहे. पांढरा शुभ्र रंग, काहीशी नाजूक, लवचिक पण भक्कम मान, बहारदार पंख, साजेशी चोच असं त्याचं रूप कोणालाही मोहून टाकेल असंच आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनींना आणि योग्यांनाही त्याच्या रूपाचं आकर्षण वाटत आलेलं आहे आणि त्यांनी त्याला अध्यात्मशास्त्रात बेमालूमपणे गुंफलेल आहे.

ज्या ज्या प्राचीन योगग्रंथांत अजपा साधेनाचा उल्लेख आहे त्या त्या ग्रंथांत "हंस" आहेच. हंस पक्षी जेंव्हा विहार करतो तेंव्हा त्याचा विहार मुक्त आणि स्वच्छंद असतो. अगदी अलगद एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. कधी पाण्यात, कधी खडकावर, कधी काठावर, कधी आकाशात असं त्याचं ऐटीत "येणं-जाण" सुरु असतं. म्हणूनच की काय प्राचीन योग्यांनी श्वासांना हंसाची उपमा दिलेली आहे. अजपा योगाचा मूलमंत्र जसा "सोहं" आहे तसाच तो "हंस" ही आहे. "ह" काराने बाहेर जाणारा तो प्रश्वास आणि "स" काराने आत येणारा तो श्वास. अजपातील हे श्वासोच्छ्वासही असेच नाही का अलगद, पिसासारखे तरंगत, हळुवार, लयबद्ध होत. ह्या श्वासांच्या पंखांवर बसूनच तर जगदंबा कुंडलिनी सहस्रारातील आपल्या प्राणसख्याला भेटायला आतुरतेने गमन करते.

प्राचीन अध्यात्माग्रंथांत हंस पक्षाचा एक काहीसा कल्पनाविलासाकडे झुकणारा असा गुणधर्म सांगितला आहे. असं म्हणतात की हंस पक्षाला जर एका वाटीत दुध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो फक्त त्यांतील दूधच प्राशन करतो. पाण्याला चुकूनही स्वीकारत नाही. हा गुण म्हणजे योगसाधकाचा विवेक किंवा सत्-सत विवेक बुद्धी. मानवी आयुष्य गुंतागुंतीचं आहे. त्याला अनेक कंगोरे आणि पैलू आहेत. आयुष्याने समोर प्रस्तुत केलेल्या अनेकानेक गोष्टींपैकी कोणत्या स्वीकारायच्या आणि कोणत्या त्याज्य मानायच्या हे ठरवणं वाटतं तितकं सोपं काम नाही. मोठे मोठे ज्ञानी म्हणवणारे लोकं सुद्धा प्रसंगी गोंधळात पडतात आणि चुकीचं पाऊल उचलतात. सामान्यांची तर बातच सोडा.

सत काय आणि असत काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे ठरवण्यास्ठी साधकाच्या अंगी थोड्या प्रमाणात तरी वैराग्य असावं लागतं. नाहीतर काय होतं की इंद्रियांच्या पलीकडे जाऊन विचार करणं त्याला कठीण जातं. प्रत्येक योगसाधकाला स्वतःची विवेकशक्ती विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. योगशास्त्रात असे काही मंत्र आहेत, काही साधना आहेत, काही क्रियात्मक उपाय आहेत ज्यांच्या सहाय्याने विवेकशक्तीला बळकटी मिळते. काही विशिष्ठ दैवतांची उपासना सुद्धा विवेकशक्तीला चालना देणारी ठरते.

जर कुंडलिनी आणि चक्रांच्या दृष्टीकोनातून बघायचं झालं तर विवेकशक्ती हे विशुद्धी चक्राचे कार्य आहे परंतु हे कार्य सुरळीत होण्यास मागल्या (अनाहत) आणि पुढल्या (आज्ञा) चक्राचीही मदत लागते. तरच "दुध का दुध और पानी का पानी" करणं शक्य होतं. साधकातील विवेकशक्ती पराकोटीची प्रगल्भ झाली की तो होतो "परमहंस". म्हणूनच संन्यास परंपरांमध्ये परमहंस ही अतिशय उच्चकोटीची पात्रता मानली जाते.

मानवी आयुष्यात चांगले-वाईट प्रसंग, उतार-चढाव येतंच असतात. योगजीवनही त्याला अपवाद नाही. फरक फक्त एवढाच असतो की हे चढ-उतार थोड्या वेगळ्या स्तरावर येत असतात. किंबहुना योगजीवन जगणाऱ्या कोणालाही अशा गोष्टींचा सामना कांकणभर जास्तच करावा लागतो. योगजीवन जगायचं म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पोहोण्यासारखं असतं. तुमच्या आजुबाजुला तेच ते भौतिक इच्छा-आकांक्षांनी माखलेले लोकं असतात. राग-लोभ-मोह-माया यांच्या पाशांत ते घट्ट अडकलेले असतात. याउलट योग्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींपासून दूर रहाण्याचा असतो. अशा लोकांचा तिरस्कार न करता आणि त्याच बरोबर त्यांच्या दुर्गुणांपासून स्वतःला अलिप्त ठेवून योग्याला मार्गक्रमण करावे लागते. योगमार्गावर प्रतिपादित केलेला साक्षीभाव, ज्ञानेश्वरीत वर्णिलेली "स्थितप्रज्ञता" आणि पतंजली योगसुत्रांत सुचवलेली "उदासीनता" हे गुण या कामी साधकाला चांगलेच सहाय्यभूत होतात. हे गुण अंगी बाणवलेला योगामार्गी साधक हंस पक्षी जसा पाण्यात राहून सुद्धा पाण्याने लिप्त होत नाही, पाणी असो अथवा जमीन असो अथवा आकाश असो तो जसा अलगद विचरण करत असतो अगदी त्याचप्रमाणे जीवन-सरिता पार करतो.

एखाद्या जलाशयात अनेक प्रकारचे पक्षी असतात. परंतु राजहंस तो राजहंस. राजहंसाची सर दुसऱ्या कोणालाही येत नाही. योगमार्गावर सुद्धा अक्षरशः ढीगभर साधना आहेत परंतु अजपाची थोरवी काही औरच आहे. म्हणूनच प्राचीन योगग्रंथ आणि मच्छिंद्र-गोरक्ष आदी उच्च कोटीचे योगी तिला "न भूतो न भविष्यति" असं म्हणून गौरवतात. अजपा साधना ही "हंसात्मक" साधना आहे. ती प्रामाणिक साधकाला एक दिवस "राजहंस" बनवल्याशिवाय रहात नाही. गरज असते ते प्रामाणिकपणे प्रयत्नशील रहाण्याची. उथळ गढूळ पाण्यात वेळ न घालवता सरोवराच्या खोल गर्भात सूर मारण्याची. खुरट्या उड्या न मारता अथांग आकाशात झेप घेण्याची.

येथे सहज ग.दि.माडगूळकरांच्या प्रसिद्ध ओळी आठवतात -

एकेदिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

असो.

सध्या दिवाळीचे प्रकाशमान दिवस सुरु आहेत. ज्ञानेश्वरीत कुंडलिनीला विद्युल्लतेची उपमा दिलेली आहे. कुंडलिनीच्या या तेजाळ प्रकाशात सर्व योगाभ्यासी वाचकांना स्वतःच्या "राजहंस" स्वरूपाचे दर्शन होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 28 October 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates