निसर्गाच्या सान्निध्यात

निसर्गाच्या सान्निध्यात

बरेच साधक बर्षोनवर्षे प्राणायाम, ध्यान वैगेरे गोष्टी करत असतात. तरीही त्यांची आध्यात्मिक प्रगती होताना दिसत नाही. असे का होते बरे? कारण बहुतेक वेळा असे साधक आध्यात्मिक प्रगती आणि दैनंदीन आयुष्य हे अत्यंत निगडीत आहेत हे साफ विसरून जातात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आपल्य आयुष्यातील अन्य गोष्टींवर प्रभाव पडत असतो. कधी हा प्रभाव सकारात्मक असतो तर कधी नकारात्मक. पण प्रभाव पडतो हे नक्की.

साधक बर्‍याचदा एकीकडे साधना करत असतो पण दुसरीकडे मनाचा पोत जपण्यासाठी काहीच उपाय करताना दिसत नाही. अशाने प्रगती होणे शक्य नाही. रोजच्या आयुष्यात मनाचा पोत बिघडवणार्‍या असंख्य घटना आपल्या अवतीभवती घडत असतात. त्यांचा प्रभाव तुमच्या साधनेवर व एकुणच आध्यात्मिक जीवनावर पडत असतोच. तुम्हाला जर कपडे स्वच्छ ठेवायचे असतील तर दोन गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे ते स्वच्छ धुवावे लागतात आणि दुसरी म्हणजे त्यांना धुळ, डाग लागणार नाहीत यासाठी जपावे लागतात. मनाचेही असेच आहे. केवळ साधना करून ते स्वच्छ ठेवता येत नाही. त्यावर मळ बसणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते.

दैनंदीन आयुष्यात मनाची काळजी कशी घ्यावी हे डझनावारी उदाहरणांनी सांगता येईल. तो या लेखाचा मुख्य विषय नाही. या दैनंदीन खबरदारी व्यतिरीक्त तुम्ही अजुन एक गोष्ट करू शकता जी तुमच्या आध्यात्मिक जीवनाला पोषक ठरू शकते. ती गोष्ट म्हणजे निसर्गाच्या कुशीत शिरणे. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर तुम्हाला असे प्राकर्षाने दिसेल की निसर्गातील प्रत्येक गोष्ट दैवी चैतन्याने अगदी ओतप्रोत भरली आहे.

कित्येक साधक निसर्गाच्या सान्निध्यात तर जातात पण तेथेही त्यांचे 'खाओ पिओ मजा करो' हेच चालू असते. आजुबाजुच्या निसर्गाकडे नीटपणे बघण्यास त्यांना फुरसत नसते. निसर्गाच्या जवळ जाऊन त्याच्या कडून परमेश्वरी चैतन्याची अनुभूती प्राप्त करण्यासाठीही तुमच्याकडेही योग्य दृष्टी हवी.

निसर्गाकडून ही अनुभूती कशी मिळवावी? असे समजा की तुम्ही हिरवळीने नटलेल्या, धबधबद्यांची नाजूक नक्षी ल्यालेल्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेला आहात. तेथे गेल्यावर काय कराल? खालील मुद्दे लक्षात ठेवा:

जाताना कमीतकमी सामान बरोबर न्या. काही माणसं एवढे सामान बरोबर घेतात की त्यांचे सारे लक्ष त्या सामानाच्या देखरेखीतच गुंतलेले असते. चैनीच्या वस्तू अजिबात बरोबर घेऊ नका. तुम्ही निसर्गाच्या जवळ काही शहरी चैन करण्यासाठी जात नाही आहात हे लक्षात ठेवा. तेव्हा तुमच्या म्युझिक सिस्टिम, वॉकमन घरीच ठेवा. खाण्यापिण्यासाठी हलक्या (पोटाला आणि वजनाला) गोष्टीच घ्या. माणसंही कमीतकमी असू देत. उगाच वायफळ गप्पा करणार्‍या मित्रांचा ग्रुप घेऊन जाऊ नका. तुम्ही एकटे जाऊ शकत असाल तर सर्वात उत्तम! 

गेल्या दिवशी जर तुम्ही प्रवासाने थकलेले असाल तर विशेष काही करू नका. थोडी फार भटकंती केली तरी पुरे आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठा. फार लवकर उठायची गरज नाही. अशा बेताने उठा की उजाडण्याच्या आधी तुमची आन्हिकं आटोपलेली असतील. दिवस एकदम उजाडत नाही. काळोखातून प्रकाशाकडे होणारे हे संक्रमण किती लोभस असते हे कधी पाहिलेय? न चुकता ते पहा. जसंजसा दिवस उजाडतो तसंतशी पक्षांची किलबिल, आकाशाचा रंग, हवेचा गारवा बदलत जातो. हे सारे सुक्ष्म बदल अनुभवा.

त्यानंतर नाश्ता करून फेरफटका मारायला निघा. निघताना आपला मोबाईल आणि घड्याळ काढून ठेवा! या कृत्रिम गोष्टींची निसर्गात जाताना गरज नाही. चालत असताना तुम्ही गाडी पकडायला जात नाही आहात हे लक्षात ठेवा. संथ पणे जा. आजुबाजुला पहा. ओबडधोबड पायवाटेचा पायांना होणारा स्पर्श अनुभवा. झाडे, पक्षी, फुलपाखरे पहा. ही सारी तुमच्यासारखीच परमेश्वराची लेकरे नाहीत का? त्यांच्यात आणि तुमच्यात एकच परमेश्वरी चैतन्य भरलेले नाही का? 'सर्वं खलिद्वं ब्रह्म' याचीच ही साक्ष नाही का? पहा ते पक्षी, ती फुलपाखरे कशी आनंदाने बागडत आहेत आणि तुम्ही स्वतःला कसे सिमेंटच्या जंगलात कैद करून घेतले आहे. एकच चैतन्य मायेच्या प्रभावाने कसे गुलाम बनले आहे! 

जागोजागी थांबा. एखाद्या नाजूक पाने असलेल्या झुडपाजवळ जा. त्याल हळोआवारपणे कुरवाळा. त्याची लुसलुशीत पाने तळव्यावर ठेवून त्यांचा स्पर्श अनुभवा. कोणतीही फुले वा पाने छान दिसतात म्हणून तोडू नका!  ज्या आपुलकीने तुम्ही नाजूक झुडुप कुरवाळलेत त्याच आत्मियतेने एखादे काटेरी झाडही कुरवाळा. त्याला सांगा 'बाबारे! देवाने तुला स्वसंरक्षाणासाठी काटे दिलेत. ते तु कधी मुद्दाम दुसर्‍याला बोचत नाहीस. पण आम्ही माणसे बघ. दुसर्‍याला ओरबाडण्यासाठी कसे टपलेले असतो. आम्हालाही तुझ्या कसे बनता येईल?'.

जाता जाता एखादा धबधबा, झरा अथवा नदी लागली तर तीच्याशी गुजगोष्टी केल्याखेरीज पुढे जाऊ नका. त्या प्रवाहातील पाणी पहा. ते पाणी क्षणाक्षणाला बदलत असते पण तरीही तो प्रवाह मात्र तोच आहे असे वाटते. या जगाचेही तसेच नाही का? नित्य त्यात असंख्य बदल होत असतात पण आपल्याला ते जुनेच वाटते. त्या प्रवाहातील पाण्यात डंबण्याची इच्छा झाली तर खुशाल डुंबा पण बेताने. त्या डुंबण्याचा धांगडधिंगा होवू देवू नका.   

संध्याकाळी परतल्यावर हातपाय धुऊन ध्यानाला बसा. प्रथम दिवसभरात पाहिलेली परमेश्वरी रूपे आठवा. ती पाहताना झालेला आनंद आठवा. तो आनंद मनातल्या मनात परत निर्माण करण्याचा प्रयत्न करा. रोजच्या सारखी देव्हार्‍यातील देवाचा फोटो वा मुर्ती पुजण्यापेक्षा निसर्गात ओतप्रोत भरलेल्या देवाची मानसपुजा करा. मग सावकाशपणे नामस्मरण वा अजपा सुरू करा. मनातल्या मनात देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. पहा आता तुमचे ध्यान तुम्हाला कसा आनंद मिळवून देते ते!


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 27 July 2009


Tags : साधना ध्यान विचार