Untitled 1

भगवान दत्तात्रेयांचा शिवरूपी तेरावा अवतार

महाराष्ट्रात दत्त संप्रदाय असं म्हटलं की पहिले आठवते ती भगवान दत्तात्रेयांची गुरु चरित्रातील परंपरा. अवधुतमुर्ती दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लीला सर्वांनाच परिचित आहेत. त्यामानाने कमी परिचित असलेली "षोडश अवतार" परंपराही दत्त संप्रदायात आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या सोळा दत्त अवतारांची ओळख करून देणारी "श्रीदत्तात्रेय षोडश अवतार चरितं" नामक एक संस्कृत रचनाही केलेली आहे.

या "सोळा अवतार" परंपरेनुसार भगवान दत्तात्रेयांचा तेरावा अवतार हा शिवस्वरूप आहे. या अवताराची कथा संक्षेपाने अशी आहे.

एकदा माहूर गड परिसरात वास्तव्यास असणाऱ्या कोणा एका पिंपलनाग नावाच्या इसमाला एका झाडाखाली अतिशय तेजस्वी आणि तरुण असा कुमार दिसला. जटाजूट धारण केलेला, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा परिधान केलेला, हाती वेद असणारा असा तो कुमार होता. परंतु त्याचं वर्तन आणि लक्षणं काही अजबच होती. बाल-उन्मत्त-पिशाच असं वागणं. ना धड संसारी ना धड संन्यासी अशी त्याची विचित्र रहाणी दिसत होती. हाती मद्याचा पेला (ज्ञानामृत) आणि जवळच एक नग्न स्त्री (माया) असं एकंदरीत निषिद्ध वाटावं असं त्याचं स्वरूप होतं.

पिंपलनागाने पुढे होऊन त्या कुमाराला त्याची ओळख विचारली आणि अशा परस्पर विरोधी वर्तनाचा जाबही विचारला. तो कुमार म्हणजे अवधूत शिरोमणी दत्तात्रेयच होते. अवधूत अवस्था नसानसात भिनलेले दत्तात्रेय त्याला आपली ओळख देतांना सांगतात की विवेक आणि वैराग्या शिवाय आत्मज्ञान होणे शक्य नाही. पोकळ वर्णाश्रमाचा डोलारा बाळगण्यापेक्षा शुद्ध आणि सात्विक मनाने अंतर्मुख होऊन आत्म चिंतन केले पाहिजे.

भगवान दत्तात्रेयांच्या ज्ञानदानाने पिंपलनागचे डोळे उघडले. त्याला पश्चात्ताप झाला. तो दत्तात्रेयांना शरण गेला आणि त्यांचा अनुग्रह मागता झाला. त्याला अनुग्रह देऊन दत्तात्रेयांनी शिवरूप धारण करून दर्शन दिले. हा प्रसंग श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी सोमवारी घडला. या अवताराचा नाममंत्र "ओम शिवरूपाय नमः" असा आहे.

दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ११ डिसेंबर २०१९ हा कालावधी या सोळा अवतारांत विराजणाऱ्या दत्तगुरुंच्या उपासनेसाठी उत्तम आहे. इच्छुकांनी आपापल्या कुवतीनुसार अवश्य प्रयत्न करावा.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचकांना अवधूत शिरोमणी भगवान दत्तात्रेयांचा योगाशिर्वाद प्राप्त होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 02 December 2019




Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates