Untitled 1

वेब साईटच्या वाचकांशी संवाद - मे २०१५

प्रिय वाचकांनो,

आमच्या वेब साईटच्या प्रश्नोत्तराच्या सदरातील ही पहिली पोस्ट. मे महिना सुरू आहे. हवेत उष्णता बरीच आहे. तेव्हा आहार-विहार साधनेला पोषक असू द्या. योगशास्त्रात काही प्राणायामांची विभागणी उष्ण आणि शीतल अशी केलेली दिसते. जसे सूर्यभेद म्हणजे उष्ण, शितली-सित्कारी शीतल वगैरे. ऋतुनुसार असे प्राणायामही कमी-अधिक करावे लागतात. अन्यथा त्रास होऊ शकतो. या वेब साईटवर दिलेली अजपा साधना करण्याचा फायदा म्हणजे त्यात शीत-उष्ण असा धोका अजिबात नाही. नैसर्गिक श्वसन हे तर सर्वच ऋतूंत सुरू असतं. त्याकडे साक्षी भावाने पाहिलं की झालं! असो.. आता वेब साईटच्या वाचकांनी विचारलेल्या काही प्रश्नांकडे वळू.

 प्रश्न

नमस्कार,
मला सकाळी साधना करत असताना अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठ असा त्रास होतो आहे. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट्स नॉर्मल सांगितले आहेत. माझ्या साधनेत विष्णु मंत्र, मृत्युंजय मंत्र आणि स्वामी मंत्र यांचा जप, चक्र धारणा आणि ध्यान इत्यादींचा समावेश आहे. मी काय करावे?

उत्तर

सर्वप्रथम तुम्हाला हे शोधून काढणे गरजेचे आहे की हा त्रास खरोखरच साधनेने होतो आहे का. त्यासाठी काही दिवस साधना पूर्ण बंद ठेवावी आणि त्रासही थांबतो का ते पहावे. जर त्रास थांबला तर त्याचा साधनेशी काही संबंध आहे असे म्हणता येईल. तुमची साधना हठयोग साधनांच्या तुलनेने  तशी मंद स्वरूपाची आहे. त्याने खरतर असा त्रास व्हायला नको. पण तरीही प्रथम त्याची खातरजमा करावी.

त्याच बरोबर काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.

  • काही लोकांना सकाळी उठल्यावर गॅस हा अपानाच्या मार्गे किंवा ढेकर वगैरेच्या स्वरुपात बाहेर टाकण्याची प्रवृत्ती असते. जर तुम्हाला तशी प्रवृत्ती असेल तर उठल्यावर लगेच साधनेला न बसता थोडा वेळ थांबावे. गॅसचा निचरा झाल्यावर मग साधनेला बसावे.
  • मानवी शरीराचे biological clock असतं. तुमच्या नित्य शौचाला जाण्याची वेळ जर साधनेच्या वेळेशी ताळमेळ खात नसेल तरी असा त्रास होणं शक्य आहे.
  • तुमच्या आहारात काही अमुलाग्र केला आहे हा ते पहावे. उदाहरणार्थ, रात्री अतिशय कमी जेवणे. त्यामुळे पोट रात्रभर रीकामे राहून गॅस होऊ शकतो.
  • जर बद्धकोष्ठ्तेचा त्रास जास्त असेल तर रात्री झोपताना कोमट दुधात साजूक तुपाचे दोन-तीन चमचे टाकून ते प्यावे. इसबगोल किंवा तशा मल घट्ट करणार्‍या औषधांचा वापर टाळावा.
  • चक्र ध्यान काही दिवस बंद करावे. विशेषतः मूलाधार चक्रावर आणि माणिपूर चक्रावर ध्यान करू नये. जर चक्र ध्यान करायचेच असेल तर फक्त अनाहत किंवा आज्ञा चक्रावर करावे.
  • कोणत्याही प्रकारचे बंध जसे मुलबंध, उड्डियान बंध अजिबात लावू नयेत.

आशा आहे श्रीशंकर तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.

प्रश्न

आदरणीय सर,
मी तुमच्या वेब साईटची नियमित वाचक आहे. तुमची वेब साईट नेहमीच चांगली माहिती देत असते. त्याबद्दल धन्यवाद. मी एका पुस्तकात असं वाचलं होतं की अनुलोम विलोम सारख्या प्राणायामांमुळे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला फायदा होतो. अजपा साधनेत तसं काही होतं का? अजपा साधनेचा मेंदूवर काही परिणाम होतो का?

उत्तर

अनुलोम विलोम सारखे प्राणायाम नेमके कशा प्रकारे मेंदूवर परिणाम करतात ते समजावून घेणे गरजेचे आहे. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास (सूर्य नाडी) मेंदूच्या डाव्या भागाला प्रभावित करतो आणि उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास (चंद्र नाडी) मेंदूच्या उजव्या भागाला प्रभावित करतो. अनुलोम विलोम सारख्या प्राणायामांमध्ये एकदा डाव्या आणि मग उजव्या नाकपुडीने वारंवार श्वास-प्रश्वास केला जातो. परिणामी मेंदूच्या डाव्या-उजव्या भागाला उत्तेजन मिळत असते, त्यामध्ये समतोल प्रस्थापित होत असतो. हा समतोल रोग निर्मूलन आणि एकूणच आरोग्यावर सुपरिणाम घडवून आणतो.

अजपा साधनेत हा डावा-उजवा प्रकार मुद्दाम केला जात नाही. मानवी शरीरात दर काही काळाने आपोआप एकदा चंद्र स्वर आणि मग सूर्य स्वर बलवान करण्याची रचना आहे. म्हणजे शरीर खरतर आपोआपच असा "अनुलोम-विलोम" करतच असते. अजपा साधनेच्या प्रदीर्घ अभ्यासाने साधकाला केवळ मासनिक संकल्पाने आपला स्वर बदलणे शक्य होते. मुख्य म्हणजे नियमित सरावाने साधकाचे दोन्ही स्वर समान वाहू लागतात आणि सुषुम्ना जागृत होण्यास मदत मिळते. म्हणजे अजपा सुद्धा मेंदूवर सुपरिणाम घडवून आणताच असते पण थोड्या निराळ्या पद्धतीने.

हठयोगोक्त कुंभकयुक्त प्राणायाम आणि अजपा शेवटी "केवल कुंभक" याच दिशेने वाटचाल करत असतात.

आता प्रश्न असा पडू शकतो की अजपा साधकाने अनुलोम-विलोम सारखे प्राणायाम करावेत का? मी असं सांगीन की जर वेळ असेल तर थोड्या प्रमाणात ते करायला काहीच हरकत नाही. परंतु त्यांचा अतिरेक टाळावा. त्यांच्या अति सरावाने होऊ शकणारे संभाव्य धोके अजपा साधनेत नाहीत. जर रोग-निर्मूलन या उद्दिष्टाने तुम्हाला अनुलोम-विलोम करायचा असेल तर एखाद्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करायला काहीच हरकत नाही.

आशा आहे श्रीशंकर तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.

प्रश्न

नमस्कार सर,
मी अनेक वर्षे नामस्मरणाची साधना करत आहे. आपली वेब साईट वाचून अजपा साधनाही करावीशी वाटत आहे. या दोन्हीचा मेळ कसा करता येईल?

उत्तर

अति उत्तम. तुम्ही जरूर दोन्ही साधना कराव्यात. प्रथम नामस्मरण करावे आणि मग अजपा साधनेला बसावे. अजपा साधना या वेब साईटवरून नीट वाचावी आणि सराव करावा. ज्या इष्ट दैवतेचा जप केला त्याच्याशी एकरूप होण्याच्या प्रयत्न अजपा साधनेत करावा. हाच "सोहं" भाव. मात्र अजपा करत असताना नामस्मरणाचा मंत्र मनात घोळवू नये. लक्ष श्वासांवर आणि सोहं वरच असू द्यावे. दिवसातल्या इतर वेळी मनातल्या मनात नामस्मरण सुरू ठेवावे.

आशा आहे श्रीशंकर तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Posted On : 18 May 2015


Tags : योग अध्यात्म साधना