Untitled 1

अजपा साधनेद्वारे सकारात्मक स्वयंसूचना

सध्या सर्वत्र अत्यंत विचित्र परिस्थिती आहे. स्वतःविषयी आणि आपल्या परीजनांविषयी काळजी, भय, चिंता, त्रागा इत्यादी गोष्टींनी सर्वच ग्रासले गेले आहेत. ज्या प्रमाणे शारीरिक काळजी घेण्यासाठी अनेकानेक उपाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी सांगत आहेत त्याचप्रमाणे मानसिक शुद्धतेची सुद्धा सर्वाना गरज आहे. मनातील नकारात्मकता आणि मरगळ झटकून टाकून त्या जागी सकारात्मकता कशी आणता येईल याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करणे अगत्याचे झाले आहे.

अशा वेळी मनाला टवटवी आणण्यासाठी आणि मनातील सकारात्मकता वाढवण्यासाठी अजपा साधनेचा उपयोग करून घेणे शक्य आहे. त्या दृष्टीने अजपा साधनेचे एक विशिष्ठ प्रकारे केलेले आवर्तन फायदेशीर ठरू शकेल. हे कसे करायचे ते थोडक्यात पाहू.

प्रथम तुमच्या घरातच एखादी अशी जागा निवडा जिथे तुम्ही एकांतात शांतपणे ध्यानाला बसू शकाल. त्या नंतर दक्षिण दिशा सोडून अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे. जर दिशा नीट माहित नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. घरातील देव्हाऱ्याकडे तोंड करून बसावे. बसण्यासाठी दैनंदिन साधनेचे आसनच वापरावे.

साधनेला सुरवात करण्यापूर्वी स्वतःशी पक्के ठरवावे की तुमच्या दृष्टीने "नकारात्मकता" आणि "सकारात्मकता" म्हणजे नक्की काय आहे. याचं कारण असं की या दोहोंची व्याख्या भिन्न-भिन्न असू शकते. उदाहरणार्थ एखाद्या संन्याशाच्या दृष्टीने वैराग्य ही सकारात्मक गोष्ट असेल पण एखाद्या संसारी माणसाच्या दृष्टीने ती कदाचित नकारात्मक असू शकेल. ज्याच्या त्याच्या मानसिक आणि वैचारिक जडणघडणीवर ह्या व्याख्या अवलंबून असतात. तेंव्हा तुमची त्याविषयीची संकल्पना काय आहे ते ठोसपणे मनाशी ठरवावे.

आता डोळे मिटून शांतपणे बसावे आणि अजपा विधीनुसार आपले नैसर्गिक पणे होणारे श्वास मनोमन अनुभवावे. आता तुमची "सकारात्मकतेची" जी काही व्याख्या आहे ती मनोमन "सो" काराशी अर्थात आत येणाऱ्या श्वासाशी संलग्न करावी किंवा जोडावी. त्याचबरोबर तुमची "नकारात्मकतेची" जी काही व्याख्या आहे ती मनोमन "हं" काराशी अर्थात बाहेर जाणाऱ्या उच्छ्वासांशी संलग्न करायची आहे. श्वासांद्वारे "सकारात्मकता" तुमच्या अंतरंगात प्रवेश करत आहे आणि प्रश्वासांद्वारे "नकारात्मकता" तुमच्या अंतरंगातून बाहेर जात आहे. लक्षात घ्या ही जोडणी प्रक्रिया मानसिक स्तरावर करायची आहे. एक सोपे उदाहरण देतो म्हणजे नीट कळेल. असं समजा की "सो" रुपी श्वासांशी तुम्ही "Happiness in" ही भावना जोडली आहे आणि "हं" रुपी उच्छ्वासांशी "Sorrow out" ही भावना जोडली आहे. आता जेंव्हा जेंव्हा तुम्ही श्वास आत घेणार आहात तेंव्हा-तेंव्हा तुम्ही जणू "Happiness" शोषून घेणार आहात आणि जेंव्हा-जेंव्हा तुम्ही श्वास बाहेर टाकणार आहात तेंव्हा-तेंव्हा "Sorrow" बाहेर टाकूनदेणार आहात. परत एकदा सांगतो की प्रत्येकासाठी ही जोडणी भिन्न-भिन्न असेल. आता काही मिनिटं ह्या जोडणीची मनातल्या मनात उजळणी करा. ती जोडणी मनातल्या मनात घट्ट करा. उजळणी करत असतांना सकारात्मक गोष्टीकडे अधिक लक्ष असुद्या. नकारात्मक गोष्टीवर चिंतन किंवा काळजी करणे कटाक्षाने टाळा.

आता साधनेचा पुढचा टप्पा सुरु होतो.

आता "सो" सहित एक दीर्घ श्वास आत घ्या. श्वास आत घेतांना तो वर सांगितल्या प्रमाणे "सकारात्मक" विचारा सहीत आत घ्यायचा आहे. त्या नंतर श्वास आतच रोखून धरायचा आहे. श्वास रोखून धरल्यावर मनोमन आज्ञा चक्रावर ध्यान धरत ओंकाराचा जप करायचा आहे. तुमच्या श्रद्धेनुसार ओंकाराच्या ऐवजी तुम्ही तुमचा इष्ट मंत्र वापरू शकता. श्वास फार ओढून ताणून अजिबात रोखायचा नाही. कुंभकाचा कालावधी हा तुमच्या व्यक्तिगत क्षमते नुसार भिन्न-भिन्न असेल. जो काही कालावधी असेल तो सुखमय असला पाहिजे. श्वास रोखल्यावर कोणत्याही प्रकारचा discomfort जाणवता कामा नये. आपल्या कुवती नुसार कुंभक केल्यावर आता "हं" काराने श्वास हळुवारपणे बाहेर सोडायचा आहे. श्वास सोडत असतांना वर सांगितल्या प्रमाणे "नकारात्मक" गोष्टीसह बाहेर जात आहेत अशी भावना करायची आहे. अशा प्रकारे २१ आवर्तने करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

सर्वसाधारण अजपा ध्यानात कुंभक केला जात नाही. येथे मात्र मी मुद्दाम तो करायला सांगितला आहे. वरील क्रिया जर तुम्ही बरोबर केलीत तर तुम्हाला असं आढळेल की तुमचे मन बरेच शांत आणि निश्चल झाले आहे. "सकारात्मकता" आत घेतल्याने आणि "नकारात्मकता" बाहेर टाकल्याने तुम्हाला खुप हलके वाटू लागेल.

आता साधनेचा शेवटचा टप्पा सुरु होतो.

वर सांगितल्या प्रमाणे २१ आवर्तने झाली की मग कुंभकयुक्त श्वासोच्छ्वास थांबवायचा आहे. आता तुम्ही नेहमीच्या अजपा साधनेत स्थानापन्न झालेले असाल. परंतु श्वास आणि उच्छ्वास यांच्याशी "सकारात्मक" आणि "नकारात्मक" विचारांची जी जोडणी तुम्ही केली होती ती तशीच ठेवायची आहे. कुंभकयुक्त ओंकार थांबवून आता अजपा शांभवी मुद्रा धारण करायची आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार २१ मिनिटे साधना करता आली तर उत्तमच.

वेळ असेल आणि आवड वाटली तर परत कुंभकयुक्त २१ आवर्तने करावी आणि मग साधना ईश्वर चरणी अर्पण करून आसन उचलावे.

वरील साधनेत एक चूक होण्याची शक्यता असते. ती म्हणजे नकारात्मकतेच्या संकल्पनेवर नकळत गुंतत जायला होऊ शकते. ते कटाक्षाने टाळले पाहिजे. जर प्रयत्न करून सुद्धा गुंतायला होत असेल तर "नकारात्मक" संकल्पना पूर्णतः वगळून टाकावी. फक्त "सकारात्मक" संकल्पनाच वापरावी.

असो.

"सोहं" किंवा "हंस" हा अखिल विश्वातील सर्वोच्च सकारात्मक शुभ संकल्प आहे.  अजपा गायत्रीच्या साक्षीने सर्व योगाभ्यासी वाचकांचे जीवन सकारात्मकतेने भरून जावो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 23 March 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates