Untitled 1

वेदांत, सिद्धांत आणि नाथपंथ


(नवनाथांचे पारंपारिक स्वरूप)

भारतीय अध्यात्म ज्ञानाचे सर्वोच्च शिखर म्हणजे उपनिषदे किंवा वेदांत. वेदांच्या शेवटी येत असल्याने उपनिषदांना वेदांत असे म्हटले जाते. आजमितीला जरी दोनशेच्या आसपास उपनिषदे ज्ञात असली तरी त्यातील सर्वच काही प्राचीन नाहीत. इतिहास संशोधकांच्या मतानुसार प्रमुख मानली जाणारी दहा उपनिषदे (ईश, केन, कठ, प्रश्न,  मुंडक, मांडुक्य वगैरे) हीच प्राचीन मानली जातात. त्यानंतरची अनेक उपनिषदे ही अर्वाचीन समजली जातात. एखादे उपनिषद प्राचीन की अर्वाचीन ते ठरवण्यासाठी इतिहास संशोधक अनेक पुराव्याचा अभ्यास करत असतात जसे त्या उपनिषदात वापरलेली संस्कृत भाषा, त्या भाषेची काव्यमयता, स्थळ-काळ-कर्ता यांचा संदर्भ किंवा उल्लेख इत्यादी. या लेखात आपल्याला त्या विषयाच्या खोलात जाण्याची आवश्यकता नाही. केवळ प्राचीन आणि अर्वाचीन उपनिषद हा फरक कळावा म्हणून ही माहिती दिली.

असो. तर ही जी प्राचीन उपनिषदे आहेत त्यांनी भारतीय अध्यात्म विद्येचे सर्वोच्च फलित विषद केले आहे. ते फलित म्हणजे 'सर्वम खल्विदं ब्रह्म' किंवा 'अहं ब्रह्मासि'. सर्व चराचर जगत हे ब्रह्ममय आहे किंवा मी ब्रह्मच आहे ही प्रत्यक्ष अनुभूती हा भारतीय अध्यात्मविद्येचा सर्वोच्च बिंदू आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन उपनिषदे ब्रह्म, मोक्ष, मुक्ती वगैरे गोष्टींचे वर्णन तर करतात पण या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचायचे कसे ते विस्ताराने अजिबात सांगत नाहीत. प्राचीन काळी उपनिषदकर्त्या ऋषीमुनींनी चिंतन, मनन, वैराग्य, विवेक आणि ध्यान अशा अंतरंग साधनांच्या आधारे आपले उद्दिष्ट साध्य केलेले होते. त्यांना आलेली ब्रह्मतत्वाची अनुभूती शब्दात व्यक्त करणे त्यांना जास्त महत्वाचे वाटले असावे. दुसरे असे की प्राचीनकाळी साधनामार्ग हा प्रत्यक्ष शिकवला जात असे त्यामुळे साधानामार्गाचे विस्ताराने विवरण प्राचीन उपनिषदांमध्ये फारसे आढळत नाही.

अर्वाचीन उपनिषदांमध्ये मात्र कुंडलिनी योग, हठयोग, ध्यानयोग अशा अनेक मार्गांचे सविस्तर वर्णन आढळते. विशेषतः योग-उपनिषदांमध्ये हा सर्व विषय विस्ताराने हाताळलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर अन्य प्रकाराचे योगाग्रंथ भारतात जन्म घेत होते. दक्षिणेकडील थिरूमुलार वगैरे सिद्ध योग्यांची परंपरा असो किंवा गोरक्ष नाथ वगैरे नाथ योग्यांची परंपरा असो त्यांच्या ग्रंथांमध्ये प्रामुखाने साधना मार्गाचेच विवरण आढळते. वेदांताने जे सांगितले आहे (ब्रह्ममय स्थिती) त्याला साधनेद्वारे प्राप्त करणे किंवा सिद्ध करणे हा या ग्रंथांचा आणि परंपरांचा मुख्य उद्देश आहे. म्हणून याला सिद्धांत असे म्हणतात. अनेक नाथ सिद्धांनी आणि शैव सिद्धांनी हे मार्ग चोखाळले आहेत आणि त्यांद्वारे आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. अर्थात हे "सिद्ध" मार्ग आहेत. या अशा नानाविध सिद्ध मार्गांपैकी एक महत्वाचा मार्ग म्हणजे नाथ संप्रदाय. विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपराना या नाथ संप्रदायाचे भक्कम पाठबळ लाभलेले आहे हे अभ्यासू वाचकांना सहज कळून येण्यासारखे आहे.

तुम्ही जर नाथ पंथाच्या प्रामाणिक ग्रंथाचा (प्रामुख्याने मच्छिंद्र-गोरक्ष यांच्या ग्रंथांचा) अभ्यास केलात तर तुम्हाला त्यात मोक्ष किंवा मुक्ती या संकल्पनेविषयी भारंभार लिहिलेले आढळणार नाही. मोजक्या शब्दात त्यांनी साधनेचे उद्दिष्ट सांगितले आहे पण त्यांचा सर्व भर मात्र सिद्धांतावर आहे. आता हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण असे की नाथपंथी योग किंवा साधनामार्गावरून वाटचाल करत असतांना तो सर्वांगीणपणे आचरणात आणणे गरजेचे आहे. आजकाल असे चित्र दिसते की नवीन साधक तात्त्विक बैठक एका मार्गाची, एक साधना एका गुरूची, मंत्र दुसऱ्या गुरुचा असले प्रकार करतांना आढळतात. आपली पटकन प्रगती व्हावी हा साधकाचा उद्देश जरी चांगला असला तरी ही अशी "भेळ" उपयोगी पडत नाही. 

मुद्दा नीट कळण्यासाठी एक व्यवहारातले उदाहरण देतो.  समजा तुम्हाला एक गणित सोडवायला दिलेलं आहे. असं धरून चालू की ते गणित सोडवायच्या दोन पद्धती अस्तित्वात आहेत. अर्थातच तुम्हाला या दोन पैकी कोणतीतरी एक पद्धत स्वीकारणे भाग आहे. आता कल्पना करा जर तुम्ही या दोन पद्धतीमधील स्टेप्सची सरमिसळ केलीत तर काय होईल? अर्थातच उत्तर चुकेल. म्हणजे दोनही पद्धती बरोबर असून केवळ त्यांची सरमिसळ केल्याने तुमचं उत्तर चुकलं. हाच प्रकार योगमार्गावर होतो. साधक स्वतःच्या मनानुसार, पुस्तकी वाचनाच्या आधाराने किंवा इंटरनेटवर काही वाचून स्वतःची साधना विकसित करण्याचा प्रयत्न करतात. त्यात सुरवातीला थोडेफार यश येतही असेल पण अंतिम उद्दिष्टाचा विचार करता त्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता अधिक.

हे मुद्दाम सांगितले अशासाठी की अनेक वाचकांना आणि साधकांना असं वाटत असतं की नवनाथांची भक्ती केली किंवा एखादी नाथ पोथी वाचली म्हणजे आपणही नाथ संप्रदायाचे अनुयायी झालो. अशी चुकीची समजूत करून घेण्याने नाथ पंथाचा जो मुख्य गाभा आहे - कुंडलिनी योग - त्याकडे अशा साधकांच दुर्लक्ष होतं. नाथपंथी योगमार्ग मंत्र-हठ-लय-राज अशा चार प्रकारांत विभागलेला आहे. अजपा साधना हा त्याचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. नवनाथांची भक्ती किंवा पारायण वगैरे गोष्टी इच्छा असल्यास जरूर कराव्यात पण त्यांनी योगमार्गावर प्रगती होईल अशी अपेक्षा करू नये. त्यासाठी नाथ संप्रदायोक्त योगमार्गाचीच कास धरायला पाहिजे.

आता हा नाथ संप्रदायोक्त मार्ग कसा आहे? त्याला आधारभूत ग्रंथ कोणते? खऱ्या साधना कोणत्या आणि भेसळ कोणती? या मार्गाचे उपास्य कोणते आणि त्याची उपासना कशी करायची? या मार्गाचे कालसापेक्ष आचरण कसे करायचे? हे प्रश्न आजकालच्या साधकालाच पडतात असे नाही. जुन्या काळी मुमुक्षु साधकांना असे प्रश्न पडत असतं आणि त्यांचे उत्तर शोधण्यासाठी ते आधार घेत तो एखाद्या सद्गुरूचा! नाथपंथामध्ये सद्गुरूची महती आणि गरज एवढी महत्वाची आहे की नाथपंथाचे एक नाव आहे गुरुपंथ. आपल्या सद्गुरूच्या कृपाछत्राखाली राहून नाथपंथाचा योगशास्त्रोक्त अभ्यासच घडायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.

आज साधक गुरु कसे शोधतात? त्या गुरूची संस्था कीती मोठी आहे, तो प्रवचने कशी देतो, तो प्रसिद्ध किती आहे, तो काही चमत्कार करू शकतो की नाही. आपल्या मनमानी जीवनशैलीला बाधा न पोहोचता या गुरुचे म्हणणे अंगीकारता येईल का. असल्या उथळ आणि भौतिक निकषांवर आजचा साधकवर्ग आपले गुरु ठरवत असतो. गुरुही प्रसिद्धी, पैसा, आश्रम, देशा-विदेशात आपल्या मताचा आणि संस्थेचा प्रसार अशा उथळ गोष्टींतच गुरफटलेले आढळतात. बर या अशा गुरु-शिष्यांचे नाते काळाच्या कसोटीवर टिकेल याचाही काही भरोसा नसतो. या सगळ्यात चूक सर्वस्वी त्या साधकांची किंवा गुरूंची असते असे नाही पण असे घडते हे ही तितकेच खरे. उघड्या डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने आजुबाजुला पाहिल्यास असे अनेक साधक आणि त्यांचे गुरु आपल्याला दिसतील. असो. त्या विषयात अधिक खोलात शिरण्याचे आपल्याला प्रयोजन नाही.

गुरूविषयी हे सांगण्याचे कारण असे की नाथपंथी सद्गुरू असे थोर असतात की शिष्यांनी गुरुला शोधण्याऐवजी गुरूच शिष्याला शोधत येतो. माझा स्वतःचा याविषयीचा अनुभव मी देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतीचा दंशु या माझ्या पुस्तकांमध्ये विस्ताराने दिलेला आहे.  माझ्या अनुभवावरून मी एक मात्र जरूर सांगीन की या आदिनाथ परंपरेतील गुरु जन्मोजन्मीही साधकाचा हात सोडत नाहीत. शैव आणि नाथ परंपरांत गुरु-शिष्य नाते हे जन्म-मृत्यूच्या पलीकडले असते. एकदा सद्गुरूने तुमची जबाबदारी स्वीकारली की मग तुमचं काम एवढंच की गुरुप्रदत्त मार्गावरून विचलित न होता पुढे पुढे चालत राहणं. बस्स! म्हणूनच सिद्ध गोरक्षनाथ सिद्ध-सिद्धांत-पद्धती मध्ये म्हणतात - परमपद गुरुमय आहे!


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 01 December 2015


Tags : योग अध्यात्म शिव कुंडलिनी नाथ