Untitled 1

उर्ध्वाम्नाय मार्गावरील अजपा अर्थात श्रीपराप्रसाद मंत्र

योगमार्गाचे अंतिम उद्दिष्ट अद्वैत परमपदाची प्राप्ती हे असले तरी कोणत्याही जीवदशेला अद्वैत ही थेट साधणारी गोष्ट नाही. आपण जर आपल्या आजुबाजुला आणि आयुष्याकडे नीट नजर टाकली तर सर्वत्र द्वैत ओतप्रोत भरलेलं आहे असं आपल्याला दिसेल. दिवस-रात्र, सूर-असुर, पुरुष-स्त्री, शिव-शक्ती अशा अनेकानेक "जोड्या" या जगात अस्तित्वात आहेत. वरकरणी पाहता आपण द्वैत एका बाजूला आणि अद्वैत एका बाजूला अशी विभागणी करतो. परंतु सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केल्यास असे आढळते की द्वैत काय किंवा अद्वैत काय हा एक जाणीवेचा किंवा अनुभूतीचा टप्पा आहे. सोन्याच्या निरनिराळ्या दागिन्यांकडे "दागिने" दृष्टीने पाहिलं तर ती द्वैत भूमी होते आणि त्याचं दागिन्यांकडे "सोनं" दृष्टीने पाहिलं की साधक अद्वैत भूमीवर आरूढ होतो. अर्थात द्वैताकडून अद्वैताकडचा हा अनुभूतीचा टप्पा साधा सोपा नाही हे उघड आहे.

या जोड्यांची दुसरी एक गंमत म्हणजे त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. दिवसाचे अस्तित्व हे रात्रीवर अवलंबून आहे. जर रात्रच नसेल तर दिवस असणेही शक्य नाही. एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे त्यांचं अस्तित्व एकमेकांशी जोडलेलं आहे. हा द्वैत आणि अद्वैत प्रकार अजपा साधनेला सुद्धा लागू पडतो. अजपा साधना म्हणजे श्वास आणि प्रश्वास यांची जोडगोळी. आपण कधी फक्त श्वासच घेतो का? किंवा फक्त उच्छ्वासच टाकतो का? तर नाही. प्रत्येक श्वासापाठोपाठ उच्छ्वास हा आहेच आणि प्रत्येक उच्छ्वासा पाठोपाठ श्वासही आहे. त्यांचं अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे.

हीच संकल्पना शैव दर्शनात अर्धानारीनटेश्वर या प्रतिकात आपल्याला आढळते. शिव म्हणजे निर्गुण आणि शक्ती म्हणजे सगुण. सगुण परमेश्वर जेंव्हा आपल्या लीला थांबवतो तेंव्हा तोच निर्गुण परमेश्वर बनतो. सगुण आणि निर्गुण ह्या दोन भिन्न गोष्टी नसून एकाच गोष्टीच्या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत हे योगसाधकाने लक्षात घेतले पाहिजे. तात्पर्य हे की शिव हे जरी अंतिम उद्दिष्ट असले तरी शक्र्तीला कमी लेखून चालणार नाही. कारण शिव-शक्ती जोडी अभिन्न आहे. परमेश्वर जेंव्हा निष्क्रिय होतो तेंव्हा शिव म्हणवतो आणि तो जेंव्हा सक्रीय होतो तेंव्हा शक्ती म्हणवतो.

आता हीच संकल्पना अजपा जपाला लावूया. आगम शास्त्राप्रमाणे अजपा जपाचा मूलमंत्र आहे हंसः. या मंत्राच्या दोन पदांची विभागणी केली तर ती होते हं आणि सः. ही मंत्रबिजांची जोडगोळी म्हणजे शिव-शक्ती स्वरूपच आहे. याचा अर्थ असा की एका श्वासात अर्थात एका हंस मंत्राच्या उच्चारणात शक्ती आणि शिव अशा दोघांचा समावेश शास्त्रकारांनी केलेला आहे. याचाच अर्थ असा की अजपा साधनेत शिव आणि शक्ती अशा दोघांची उपासना आपोआप विनासायास घडत असते. इतर सर्व देवी-देवता ह्या शिव-शक्ती युगुलावर अवलंबून असल्याने अजपा जप सूक्ष्म स्तरावर सर्व देवी-देवतांची उपासना घडवून आणतो. अजपा गायत्रीला योगशास्त्रात एवढे प्रकांड महत्व का दिले गेले आहे हे आता तुम्हाला समजू शकेल.

भगवान शंकर हा पंचमुख आहे. त्याची चार मुखे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला आहेत. तर उर्वरित एक मुख वरच्या दिशेला आहे. या प्रत्येक मुखातून भगवान सहकाराने एक-एक आगमोक्त उपासना मार्ग प्रतिपादित केला अशी मान्यता आहे. त्या मार्गांना आम्नाय असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर असे पाच आम्नाय प्रधान मानले गेले आहेत. पुर्वाम्नाय, पश्चीमाम्नाय, उत्तराम्नाय, दक्षिणाम्नाय आणि उर्ध्वाम्नाय असे पाच उपासना मार्ग आहेत.

या पाच मार्गांपैकी उर्ध्वाम्नाय हा सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. प्रत्येक मार्गावर सात्विक, राजसिक आणि तामसिक साधना असल्या तरी उर्ध्वाम्नाय मधील साधना ह्या प्रामुख्याने सात्विक आहेत. षोडशी अर्थात त्रिपुर सुंदरी ही या मार्गाची प्रधान शक्ती आहे. या मार्गावरील जे मंत्र आहेत त्यांतील एक फार फार महत्वाचा आहे. तो म्हणजे श्री परा-प्रसाद मंत्र. हा पराप्रसाद मंत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कुंडलिनी योग्यांची प्राणप्रिय "अजपा गायत्री" च आहे. हंस मंत्रामध्ये शिव-शक्ती आहेत त्याच धर्तीवर परा + प्रसाद मंत्रात सुद्धा शिव-शक्तीचा वास आहे. विस्तार भयास्तव फार खोलात सांगत बसत नाही. थोडक्यात रहस्य उलगडायचं झालं तर "हंस / सोहं" म्हणजेच उर्ध्वाम्नायातील श्री प्रसाद-परा मंत्र किंवा श्री परा-प्रसाद मंत्र होय. मुद्दामच येथे या चार मंत्रांची फोड आणि त्यांतील अतिसूक्ष्म रहस्य विस्ताराने देत नाही. साधनेच्या बळकट आधारावर तुम्ही ते उलगडावे हेच उत्तम आहे.

जाता जाता अनेक अजपा साधकांकडून होणारी एक चूक सांगतो. बरेच अजपा साधक जेंव्हा साधना करत असतात तेंव्हा त्यांची श्वासांवरील जाणीव व्यवस्थित रहाते परंत्तू उच्छ्वासांवरील जाणीव निसटून जाते. थोडक्यात "शिव" आणि "शक्ती" पैकी एक पकडीत येतो तर एक पकडीतून निसटतो. तसं होऊ देऊ नका. कारण शिव आणि शक्ती दोन्ही महत्वाचे आहेत. ते एकमेकाला पूरक आहेत. एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत. मी सांगितलेली ही सूक्ष्म गोष्ट रोजच्या साधनेत अंमलात आणा. मग बघा थोड्या दिवसांनी साधनेचा पोत कसा आपोआप सुधारेल ते.

असो.

दयाळू परमेश्वराने श्वासोछ्वासांच्या रूपाने मानवाला आत्मज्ञानप्राप्त करण्याचा मार्गही जन्मतःच प्रदान केलेला आहे. त्या मार्गाचे सूक्ष्म रहस्य तुम्हाला साधनेद्वारे उलगडता येवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 10 February 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates